चित्रपट “ हेलीकॉप्टर ईला “ आई मुलाची भावनिक कथा

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- आई आणि मुलगा यांचे प्रेम खूप गहिरे असते. आई आपल्या मुलाची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत असते. मुलगा लहान असतांना त्याची काळजी घेणे हे योग्यच आहे पण तो तरुण झाला, कॉलेज मध्ये जाऊ लागला तर त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घातले तर काय होईल ,,, ह्या अश्या कल्पनेवर आधारित अजय देवगण फिल्म्स, आणि पेन इंडिया लिमिटेड या चित्रपट संस्थेतर्फे निर्माते अजय देवगण, जयतीलाल गाडा, धवल गाडा, अक्षय गाडा यांनी “ हेलीकॉप्टर ईला “ ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा-पटकथा आनंद गांधी, दिग्दर्शन प्रदीप सरकार, संवाद नितेश शहा, संकलन धर्मेंद्र शर्मा, छायाचित्रण शिरीष रे, गीते स्वानंद किरकिरे, संगीत अमित त्रिवेदी राघव बहल, यांचे असून या मध्ये प्रमुख भूमिकेत काजोल, रिद्धी सेन, तोतारोय चौधरी, नेहा धुपिया ह्या कलाकारांनी कामे केली आहेत.

ईला आणि विवान ह्या आई – मुलांच्यावर आधारित कथा आहे. ईला हि एक गायिका, अरुण नावाचा तिचा मित्र असून तो काहीसा विक्षिप्त आहे पण दोघांचे एकमेकावर प्रेम, त्यांचे लग्न होते, त्यांना विवान नावाचा मुलगा होतो, काही कारणाने अरुण घरातून निघून जातो, तो अनेक वर्षे घरी येत नाही. विवान ची आई आणि वडील हि ईला बनते, दोन्ही नाती ती उत्तम सांभाळते, लहानपणी जशी ती विवान ची काळजी घेते त्याप्रमाणे तो कॉलेज मध्ये जातो त्यावेळी सुद्धा ती काळजी घेते, त्यासाठी ती त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्याच वर्गात विध्यार्थी म्हणून प्रवेश घेते,

विवान ला ते पसंत नसते, कॉलेज मधील मित्र त्याची फिरकी घेतात, एक दिवस ईला आणि विवान चे भांडण होते आणि विवान घर सोडून निघून जातो. त्याचवेळी ईला ची सहेली तिला सल्ला देते कि तू विवान च्या प्रत्येक बाबतीत लक्ष घालणे सोडून दे. तू तुझ्या गायिकेचा विचार कर आणि तुझे स्वतंत्र आयुष्य जगायला सुरवात कर. ,,,

शेवटी नेमके काय घडते ? विवान घरी परत येतो का ? कॉलेज मध्ये काय काय घटना घडतात ? त्यातून ईला ला आपला गायिकेचा मार्ग सापडतो का ? ईला चा नवरा परत येतो का ? त्याचे पुढे काय होते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.

काजोल ने ईला ची मध्यवर्ती भूमिका सहजतेने साकारली आहे. मुलाविषयीच्या सर्व भावना उत्तम व्यक्त केल्या आहेत. विवानची भूमिका रिद्धी सेन यांनी केली असून त्या भूमिकेला त्याने न्याय दिलेला आहे. त्याच्या मनाची होणारी घुसमट आणि आई विषयीचे प्रेम ह्या भावना छान दाखवल्या आहेत. या शिवाय नेहा धुपिया, तोतारोय चौधरी असे अनेक कलाकार आहेत. गीत/संगीत दोन्ही बाजू उत्तम, गतिमान संकलन, छायाचित्रण चांगले, त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद सहजपणे जमून आले आहेत. आई आणि मुलगा ह्या पिढीवर सिनेमा सहजपणे भाष्य करतो. एकंदरीत एक आनंददायी समाधान देणारा सिनेमा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.