चित्रपट ” परी हूँ मैं ” अंतर्मुख करणारी चित्रकृती

एमपीसी न्यूज- लहानपणापासून प्रत्येकाला असे वाटत असते की, आपण कधीतरी नाटकात, सिनेमात, मालिकेत काम करावे, पण ती इच्छा मोठे झालो तरी पूर्ण होत नाही. मग अशी पालक मंडळी आपली मनातील इच्छा मुलांच्या मध्ये उतरविण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्या पालकांचे मुलांचे कुटुंबाचे काय होते ह्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित ” परी हूँ मैं ची निर्मिती करण्यात आली आहे.

योगायतन फिल्म्स निर्मित निर्माते डॉ राजेंद्र प्रताप सिंह , शीला सिंह यांनी परी हूँ मैं ची निर्मिती केली आहे. ह्याची कथा संकल्पना इरावती कर्णिक यांची असून दिगदर्शन रोहित शिलवंत यांनी केलं आहे. पटकथा मच्छिन्द्र बुगडे, रोहित शिलवंत, संकेत माने यांनी तयार केली असून संवाद लेखन योगेश मार्कंडे, संगीत संयोजन समीर साप्तीस्कर यांनी दिले आहे, संकलन निलेश राठोड यांचे असून या मध्ये नंदू माधव, श्रुती निगडे, देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत.

मुल शाळेत जातात, अभ्यास करीत असताना इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा त्यांचा सहभाग असतोच. माधव दिघे, कल्पना दिघे यांची मुलगी साजिरी दिघे ही एका बालनाट्यामध्ये राजकुमारीचे काम करते. तिच्या कामाचे कौतुक होते, त्याचवेळी ते नाटक पहायला आलेले, मालिकेसाठी कलाकारांची निवड करणारे राणे नावाचे गृहस्थ माधव दिघे यांना भेटतात आणि साजरी ने आमच्या हिंदी मालिकेमध्ये काम करावे असे सुचवतात. माधव दिघे सुरवातीला नकार देतात पण मग मुलीकडे अभिनयाचे गुण आहेत त्यामुळे ऑडीशन देऊन पहायला काय हरकत आहे असे म्हणून तिला ऑडीशनला घेऊन जातात- त्यामध्ये साजरी पास होते. तिला ‘ परी हूँ मैं” मध्ये परीची मोठी भूमिका मिळते. आणि सारेच चित्र बदलायला सुरवात होते.

चाळीत रहाणाऱ्या परीच्या आई वडीलांना एक वेगळी ओळख मिळते, परीची मालिके मधील भूमिका कायम स्वरुपाची नसते, तिच्या बरोबर काम करणारी मोठी अभिनेत्री हिला हिंदी सिनेमा मिळतो त्यामुळे ती मालिका सोडते, आणि परी ला ब्रेक दिला जातो, तिच्या आईला मालिकेत काम करणे पसंत नसते, पण वडील परीला समोर ठेवून तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊस मध्ये जाऊन परीला ऑडीशन द्यायला लावतात. हया सगळ्याचा परिणाम परी वर होतो.

माधव दिघेची भूमिका नंदू माधव यांनी सहजतेने केली असून कल्पना दिघेची भूमिका देविका दफ्तरदार, हीने मनापासून साकारलेली आहे, परीची मध्यवर्ती भूमिका श्रुति निगडेहिने केली असून. तिने हया भूमिकेला चांगला न्याय दिलेला आहे. परीचा उज्वल काळ आणि मालिका सुटलया नंतरचा काळा मधील विविध छटा तिने छान व्यक्त केलया आहेत.

परीचा छंद /हौस आणि शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड आपण आपलया मुलीवर लादत आहोत ह्याची जाणीव पालकांना कोण आणि कशी करून देते! परीला पूर्वीचे हरवलेले बालपण कसे आणि कधी मिळते! आई वडिलांना आपली चूक कशी उमगते! अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे हा सिनेमा देईल. छायांकन/संगीत संकलन छान आहे. दिग्दर्शक रोहित शिलवंत यांनी चित्रपट गतिमान ठेवला असला तरी काही ठिकाणी तोचतोच पणा जाणवतो. पालक आपलया मुलाला नको त्या वयात/ अर्थात बालपणात, प्रसिद्धीच्या वलयामध्ये आणतात, त्यांचे बालपण हरवून टाकतात, हयावर सिनेमा व्यवस्थित भाष्य करतो, मुलांचे मानसशास्र तपासताना- पालकांचे सुद्धा मानसशास्त्र तपासायला पाहिजे असा संदेश हा सिनेमा देतो. एकंदरीत सिनेमा ठीक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.