चित्रपट “ सावट , एक वेगळा भयपट “

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- भीती, — माणसाला भीती, भय, घबराट, मानसिक दडपण इत्यादी भावनांचा कधी ना कधी अनुभव आलेला असतो. भीतीचे सावट हे माणसाच्या मनावर एकदा आरूढ झाले कि त्याची विचार सरणी हि त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. एखाद्या जागेची, वस्तूची किंवा अन्य काही कारणाने भीती वाटू लागली कि त्याची मानसिकता बिघडते. आणि मनावर दडपण येते, मग त्या व्यक्तीला चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. अश्याच कल्पनेवर आधारित “ सावट “ चित्रपट तयार करण्यात आला आहे.

ह्या चित्रपटाची निर्मिती लेटरल वर्क्स प्रा. लि . आणि रिंगीन रेन फिल्म्स ह्या चित्रपट संस्थेने निरक्ष फिल्म्स च्या सहयोगाने केली आहे. निर्माते हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, शोभिता मांगलिक, हे असून सहनिर्माते शिल्पी श्रीवास्तव हे आहेत. कथा-दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांचे आहे. छायाचित्रण विनोद पाटील, संकलन पराग खौनाद, धरण सोनी यांनी केल आहे. यामध्ये स्मिता तांबे, संजीवनी जाधव, श्वेतांबरी, या कलाकरांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ही कथा आहे अधिरा आणि अशिनी ह्या दोन बहिणींची, दोघी अगदी एक सारख्या दिसणाऱ्या, पण अशिनी हि हुशार, प्रत्येक कामात पुढाकार घेणारी आणि धाडसी मनोवृतीची तर अधिरा हि स्वभावाने गरीब, कमी शिकलेली आणि काहीशी घाबरट, दडपणाखाली वावरणारी अशी असते. एकाच गावात राहणाऱ्या दोघी जणी, त्याच गावात एक घटना घडते- गेली सात वर्षे एका ठराविक दिवशी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हि आत्महत्या करते असे सलग सात वर्षे हे सत्र सुरु असते. हे कोणामुळे घडते, ह्याचा शोध घेण्यासाठी अदिती देशमुख हि तडफदार, पोलीस इन्स्पेक्टर , स्पेशल पोलीस विभागाकडून गावात तपासासाठी येते, चौकशी मध्ये असे लक्षात येते कि ह्या घटना आत्महत्येच्या वाटत असल्या तरी त्या आत्महत्या नसून ते खून आहेत.

अदिती देशमुख हि अधिरा ला भेटते. ह्या घटना घडल्या त्यावेळी अशिनी हि बेपत्ता झाली, आणि अधिरा त्या विशिष्ठ दिवशी माणसाच्या हाडाची-कवटीची पूजा करते, हे काय गूढ आहे ह्याचा हि शोध अदिती देशमुख हिला लावायचा असतो. ह्या सगळ्या प्रकरणाचा शोध अदिती देशमुख लावते का ? अधिरा आणि अशिनी ह्यांचे नाते आणखी कोणा बरोबर असते ? गावातील ह्या घटना घडविण्यात कोणाचा हात असतो ? हे षड्यंत्र नेमके काय असते ? कोणामुळे ? कश्यासाठी ? आणि का हे सारे घडत असते ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील.

स्मिता तांबे हिने इन्स्पेक्टर अदिती देशमुखची भूमिका तडफदारपणे साकारलेली आहे. भूमिकेतील बारीक-सारीक बारकावे आणि भूमिकेचे कंगोरे तिने सहजतेने सादर केले आहेत. भीती सुद्धा मनोरंजनाचा भाग होऊ शकतो. भीतीदायक वातावरणाचा विचार करताना माणसाची उत्कंठा, कुतूहल हे वाढतच जाते. आणि शेवटी तो आपल्या ध्येयापर्यंत कसा पोहोचतो हा सारा इन्स्पेक्टर अदिती देशमुख चा प्रवास स्मिता तांबे हिने सुरेख सादर केला आहे. सोबत संजीवनी जाधव, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे. दिग्दर्शक सौरभ सिन्हा यांनी त्यांची कथा बंदिस्तपणे दिग्दर्शित केली आहे. तरी काही ठिकाणी तो संथ गतीने जातो. हि भीती अधिक प्रमाणात असती तर एक वेगळा आनंद प्रेक्षकांना मिळाला असता, पार्श्वसंगीत , छायाचित्रण ठीक आहे इतर तांत्रिक बाजू ठीक आहेत. एकंदरीत सावट हा एक वेगळ्या धाटणीचा रहस्यमय, भयपट असून त्यामध्ये अनेकविध भावनांचा खेळ ठीक मांडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like