‘तानाजी’ एका शौर्याची रोमहर्षक कहाणी

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- शिवचरित्रावर चित्रपट काढणे म्हणजे शिवधनुष्यच असते. त्यातुन तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा चित्रपट काढायचं म्हणजे तर खरेच अवघड काम, एक चूकही महाग पडू शकते, त्यातुन हिंदी सिनेमा बनवताना उगाच मसाला घुसडण्याचा धोका फार असतो. पण हे सगळं सांभाळून, तारेवरची कसरत करत दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट उत्तमरित्या हाताळला आहे, तानाजीचे शौर्य हाच मूळ गाभा ठेवून, प्रामाणिकपणे एक युध्दपट साकारला आहे.

अजय देवगणने खूप समजून उमजून भूमिका साकारली आहे, चित्रपटात सगळ्यांची कामे उत्तम झाली आहे, अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सहज केली आहे. पद्मावती राव यांनी जिजाबाईंची भूमिका अप्रतिम केली आहे, आधीच्या नकारात्मक भूमिकांची छटा असलेली सैफ अली खानने साकारलेला उदयभान तरीही प्रभाव पाडतो. काजोलने साकारलेली सावित्रीबाई, तिची नवऱ्याबाबतची तळमळ मनाला चटका लावुन जाते.

शेवटी महाराजांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या “गड आला पण सिंह गेला” या वाक्याने प्रेक्षकांनाही आपले अश्रु अनावर होतात. हा या चित्रपटाचा आणि या घटनेचा लोकांवरचा प्रभाव आहे़. एका दृश्यात तानाजी साधूच्या वेशात येऊन महाराजांच्या दिशेने कुबडी फेकतो, महाराजांनी आपल्याला या मोहिमेसाठी पाठवावे म्हणजेच कठीण काळात आपल्या उजव्या हाताचा वापर करावा यासाठी केलेला हा सीन जरी किती ही चांगला असला तरी महाराजांबद्दल असलेल्या भावनांमुळे त्याने ते तसे कुबडी फेकणे खटकते. तो सीन वेगळ्या पद्धतीने ही मांडता आला असता असे वाटून जाते.

शेवटी इतकंच की हिंदीत भव्य चित्रपट आपल्या शिवाजीराजांच्या आणि स्वराज्यातल्या त्या शिलेदारांनी गौरव वाढविणारा चित्रपट काढल्याबद्दल या टीमचे कौतुक. सगळ्यांनी आवर्जून पहावा असा चित्रपट आहे. असे चित्रपट अजून भव्य व इतिहासाशी प्रामाणिक राहून होतील ही आशा.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement