Basu Chatterjee Passed Away: नामवंत चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

Filmmaker Basu Chatterjee passes away

एमपीसी न्यूज – ‘चितचोर’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’, ‘खट्टा-मीठा’ यासारख्या क्लासिक चित्रपटातून तसेच रजनी, व्योमकेश बक्षी सारख्या दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, पटकथा लेखक बासू चटर्जी यांचे निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांताक्रूझ स्मशानभूमीत दुपारी बासूदांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या रुपाली गुहा या त्यांच्या कन्या होत.

एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी, छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, मनपसंद, हमारी बहु अलका, उस पार, प्यार का घर अशा अनेकविध चित्रपटांचे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शन केले होते.

चटर्जी यांनी हिंदीसोबत बंगाली चित्रपटही दिग्दर्शित केले होते. त्यांचे चित्रपट अधिक वास्तववादी समजले जात. 70 च्या दशकात अ‍ॅक्शन चित्रपटांचे युग असताना बासू चटर्जी यांचे सिनेमे सर्वार्थाने वेगळे ठरले. दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांनी छोटी सी बात, रजनीगंधा आणि चितचोर यासारख्या चित्रपटांचे सोने केले.

बासू चटर्जी यांनी सत्तरच्या काळातील सुपरस्टार्सबरोबरही काम केले. ‘मंजिल’मध्ये अमिताभ बच्चन, ‘चक्रव्यूह’मध्ये राजेश खन्ना, ‘मनपसंद’मध्ये देव आनंद, तर पसंद अपनी अपनी आणि ‘शौकीन’मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना त्यांनी अनोख्या रुपात सादर केले.

1986 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘एक रुका हुआ फैसला’ हा ‘ट्वेल्व अँग्री मेन’चे भारतीय रुपांतर होते. हा चित्रपट आजही मास्टरपीस म्हणून रसिकांच्या स्मरणात आहे.

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बासू चटर्जी यांनी व्योमकेश बक्षी आणि रजनी या दोन हिट दूरदर्शन मालिकाही केल्या. 1992 मध्ये त्यांना ‘दुर्गा’ या चित्रपटासाठी कौटुंबिक कल्याण विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.