Hinjawadi News : चित्रपट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी करून घेण्याच्या आमिषाने चित्रपट निर्मात्याची फसवणूक

एमपीसी न्यूज – चित्रपट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी करून घेण्याचे अमिश दाखवून एका चित्रपट निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार एप्रिल 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत केपीआयटी कमिन्स जवळ, हिंजवडी येथे आणि ऑनलाईन माध्यमातून घडला आहे. याबाबत तक्रार अर्ज दिल्याने त्याच्या चौकशीअंती 12 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल लक्ष्मण कागणे (वय 29, रा. जांभुळकर चौक, वानवडी, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम धाकतोडे (वय 38, रा. राहुलनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कागणे हे चित्रपट निर्माता व विक्रीचा व्यवसाय करतात. तर आरोपी धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतो. धाकतोडे याने कागणे यांना चित्रपटाच्या अॅग्रीमेंटमध्ये घेतो आणि काही चित्रपट कागणे यांच्या नावावर करून देण्याचे अमिश दाखवले.

त्यापोटी त्याने कागणे यांच्याकडून त्याने काही रक्कम घेतली. सुरुवातीला काही रक्कम त्याने हिंजवडी येथे घेतली. तर त्यानंतरची रक्कम ऑनलाईन माध्यमातून घेतली. कागणे यांच्याकडून रक्कम घेऊन त्याचा वापर इतर कारणांसाठी केला. जे चित्रपट त्याने विकत घेतले त्याची कागणे यांच्या परस्पर विक्री करून त्याचा मोबदला कागणे यांना न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.