Pune News : पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. शहरातील किमान 32 प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला.

.महापालिकेकडून प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा 10 मार्च 2022 रोजीच राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यशासनानेच निवडणूक कायद्यात बदल केल्याने हे काम अर्धवटच थांबले होते. मात्र, शासनाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आल्यानंतर न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश देत जुनी प्रभाग रचना कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर लगेचच आयोगाकडून प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

त्यात, आयोगाच्या सूचनेनुसार 11 मे रोजी आयोगाच्या सूचनेनुसार, प्रभाग रचना बदल करून अंतिम करणे आणि 12 मे रोजी प्रभाग रचनेस अंतीम मान्यता घेऊन आयोगाची स्वाक्षरी घेऊन अंतिम करण्याचे आदेश होते. त्यानुसार, महापालिकेने सादर केलेली प्रभाग रचना अंतिम करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरात 58 प्रभागातून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 57 प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.