Final Year Exam : वीज पुरवठा व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या

अंतिम वर्षाच्या सर्व शाखांच्या ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षा रद्द

एमपीसी न्यूज –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा आज (गुरूवारी) घेतल्या जाणार होत्या. परंतु परतीच्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा आणि इंटरनेट सुविधा विस्कळीत झाल्यामुळे सर्व विद्याशाखांच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे वेधशाळेकडून येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वीज पुरवठा खंडित झाला असून इंटरनेट सुविधा देखील विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे ऑनलाईन परिक्षा घेण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील खोळंबल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात. यांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व विद्याशाखांच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे सुधारीत नवीन वेळापत्रक ज्या त्या विभागांमार्फत लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.