Pimpri : अखेर काँग्रेसचे घोडे गंगेत न्हाले, राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांना दिला पाठिंबा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे विलास लांडे  यांना अखेर काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महाआघाडी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे उमेदवार विलास लांडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर कविचंद भाट, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शामला सोनवणे, निगार बारस्कर, काँग्रेसचे संग्राम तावडे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जैसवाल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, माजी अध्यक्ष विशाल कसबे, एन. ए.बारस्कर आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस महाआघाडीसोबत आहे. चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे व भोसरीतील राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या विनंतीवरून आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोन्ही पुरस्कृत उमेदवारांना शहर काँग्रेसच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे. पिंपरी विधानसभेप्रमाणे चिंचवड व भोसरी विधानसभेतही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.