Pimpri : अखेर प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला, उद्या घेणार आढावा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी तब्बल तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वेळ मिळाला आहे. शहरातील राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा पालकमंत्री पाटील उद्या (शुक्रवारी) आढावा घेणार आहेत. 

महापालिका मुख्यालयात दुपारी दोन वाजता पालकमंत्री पाटील आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे.  आमदार, पदाधिकारी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प,  महापालिकेचा आकृतीबंध आणि महापालिका हद्दीवरील पश्चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट करुन घेणे, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत.

माजी पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्याचे दुस-या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे 7 जून 2019 रोजी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर 25 जुलै रोजी पालकमंत्र्यांनी भाजपच्या पिंपरी, मोरवाडीतील कार्यालयाला धावती भेट देत नियुक्तीझाल्यामुळे शहर भाजपचा सत्कार स्वीकारला. आठ दिवसात महापालिका मुख्यालयात येऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांच्याकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.

परंतु, त्यांनी आढावा घेतलाच नाही. दरम्यानच्या काळात त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. व्यवस्तेमुळे त्यांना शहरातील  प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेता आला नाही. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील उद्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार आहेत.

‘हे’ आहेत प्रलंबित प्रश्न!
पवना बंदिस्त जलवाहिनी योजना
अवैध बांधकामावर आकारण्यात आलेला शास्तीकर 100 टक्के माफ करणे
महापालिका हद्दीवरील पश्चिमेकडील गावे महापालिकेत समाविष्ट करुन घेणे
महापालिकेचा आकृतीबंध
एच.ए च्या ताब्यातील अतिरिक्त 59 एकर जमीन बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित करणे
महसूल विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.