Pune : अट्टल दुचाकी चोरटे जाळ्यात : 17 दूचाकी जप्त

एमपीसी न्यू़ज – पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातून चोरी झालेल्या तब्बल 5 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या एकूण 17 दूचाकी जप्त करत 2 आरोपींना पोलिसांनी रविवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अटक केली.

असिफ गुलाब शेख (वय 23, पारगावं, खंडाळा), अमित शिवाजी चव्हाण (वय 29, पारगाव, खंडाळा) यांनी पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातून दुचाकी मोटारसायकली चोरी केल्या होत्या. युनिट -3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे पारगाव सातारा येथून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी तब्बल 17 दूचाकी चोरल्याचे समोर आले.

गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी मास्टर चावीच्या साहाय्याने चालू करून त्यांनी या गाड्या चोरी केल्या होत्या. चोरी केलेल्या मोटारसायकल केवळ 2 ते 3 हजार रुपयांना विकून तसेच गाड्या गहाण ठेवून त्या पैशांमधून ते दारु पित असत. भोर, खंडाळा या ठिकाणांहून चोरी झालेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.