MPC Impact : …अखेर मुकाई चौक ते नवले पूलापर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू 

एमपीसी न्यूज – पुणे-बंगळुरु महामार्गावर मुकाई चौक ते नवले पूलापर्यंत ठिक ठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. यानंतर अखेर या पट्ट्यातील महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

मुकाई चौक, भुमकर चौक, भुजबळ चौक, पाषाण, बाणेर, ताथवडे, चांदणी चौक ते पुढे नवले ब्रिज पर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत. महामार्गावरील या खड्ड्यांची खोली अधिक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, दुचाकी चालकांसाठी तर हा मार्ग अधिक धोकादायक ठरत होता. याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने खड्डे बुजविण्याबाबत बातमी प्रकाशित केली होती.

अखेर या बातमीची दखल घेऊन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. महामार्गावर काही ठिकाणी 9 इंच एवढे खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारासाठी तर हा पट्टा अधिक धोकादायक ठरत आहे. अखेर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर दररोज प्रवास करणारे स्थापत्य अभियंता मालोजीराजे पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. ‘एमपीसी न्यूज’ने प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेऊन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होऊ शकेल असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.