New Delhi: देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांसाठी एक लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

बँक खात्यावर पैसे जमा होणार तर गहू, तांदूळ, डाळही मिळणार

 एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आज काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली.

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्याने कष्टकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो डाळ 

गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार असून पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार जमा होणार

देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.