Pune News : एक हजाराहून अधिक वाहनचालकांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – करोनामुळे संकटात सापडलेल्या तब्बल एक हजाराहून अधिक शालेय  वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी आर्थिक मदत देण्यात आली. पक्षाचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहरातील विविध भागातील वाहनचालकांना ही मदत देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून वाहतूकदारांना ही मदत करण्यात आली.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पहिल्या लॉकडाऊनपासून शाळा बंद झाल्या. परिणामी शालेय वाहतुकदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शालेय वाहतूक करणाऱ्यांना राज्य सरकारने  आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी संघटनेने वारंवार करून देखील शासनाकडून त्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे या वाहतूकदारांना काही प्रमाणात मदत व्हावी, यासाठी म्हणून गेल्या महिन्यात पक्षाचे सरचिटणीस नागपुरे यांच्या वतीने धान्य किट देण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करोनामुळे दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून अडचणीत सापडलेल्या वाहतुकदारांना भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला आवश्यक ती मदत केली जाईल, असा शब्द दिला होता. त्यानुसार शहरातील विविध भागातील शालेय वाहतूक करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना मदत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजक  नागपुरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव,  इंडिपेंडंट स्कूल ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग, युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष बापू मानकर, नगरसेवक दीपक पोटे, लोकमान्य सहकारी बँकेचे हर्षद झोडगे, भगवे वादळ व्हॅन चालक मालक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

डीपी रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. करोना संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. यापुढील काळात देखील अशीच भूमिका पक्षाची राहील, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

संकटाच्या काळात आरोग्य सुविधा पुरविण्यापासून या काळात शहरातील एकही नागरिक उपाशी राहणार नाही, याकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष दिल्याचे महापौर मोहोळ यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी केले. आभार पुनीत जोशी यांनी मानले.

मदतीचा छोटासा प्रयत्न ः नागपुरे

शालेय वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा व्यवसाय ठप्प असल्याने दैनंदिन खर्च भागविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, यासाठी त्यांना मदतीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, असे भाजप सरचिटणीस  दीपक नागपुरे यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.