BNR-HDR-TOP-Mobile

Mumbai : पुणे मेट्रोसाठी महामेट्रो आणि युरोपिअन गुंतवणूकदार बँक यांच्यातील वित्त पुरवठा करारावर स्वाक्षऱ्या

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोसाठी लागणारा निधी पुरवण्याच्या करारावर युरोपिअन गुंतवणूकदार बँक आणि महामेट्रोच्या अधिका-यांनी स्वाक्ष-या केल्या. मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्ष-या करण्यात आल्या. युरोपिअन गुंतवणूकदार बँकांकडून येणारा एक हजार 600 कोटी रुपयांचा निधी पुणे मेट्रोच्या अंडर ग्राउंड सिव्हिल वर्क आणि डेपोच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि. 31) झालेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे, युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेचे उपाध्यक्ष बी. अँन्ड्र्यू मॅकडॉवेल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, युरोपिअन युनियनचे भारतातील अँबेसेडर यूगो अस्थुतो, महामेट्रोचे संचालक रामनाथ, सिवमाथंन, हेमंत सोनावणे आदी उपस्थित होते.

महामेट्रोकडून पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामाला 23 जानेवारी 2017 रोजी सुरुवात झाली. 32.5 किलोमीटर लांबीचा पुणे मेट्रोमार्ग आहे. यामध्ये 30 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 11 हजार 420 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूण खर्चाच्या अर्धा खर्च केंद्र सरकार तर अर्धा खर्च राज्य सरकार करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ए एफ डी फ्रांस आणि युरोपिअन गुंतवणूकदार बँकेकडून काही रक्कम उभी करून दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे मेट्रोच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुणे मेट्रोचा विकास म्हणजे पुण्याचा विकास असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी युरोपिअन गुंतवणूकदार बँकेच्या पदाधिकाऱयांना नाशिक मेट्रो आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी अर्थ सहाय्य करण्याची विनंती देखील केली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like