Pune : नदीपात्रातून जाणा-या मेट्रो मार्गाची याचिका निकाली

एमपीसी न्यूज – मेट्रोचा मार्ग नदीपात्रामधून जात असल्याने या मार्गाला शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. याच्या विरोधात एनजीटीमध्ये (राष्ट्रीय हरित न्यायालय) याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाली काढली आहे. 
वनाझ ते रामवाडी हा मेट्रो मार्ग खंडुजीबाबा चौक मार्गाने नदीपात्रातून पालिका भवन, धान्यगोदाम, संगम ब्रिजमार्गे पुणे स्टेशन असे जाणार आहे.
त्यातील खंडुजीबाबा चौक ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या  1.4  किलोमीटरच्या मार्गाला स्थगिती द्यावी, अशी याचिका उद्योगपती अनु आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि अ‍ॅड. सारंग यादवाडकर यांनी एनजीटीमध्ये दाखल केली होती.
मेट्रोचे नदीपात्रालगतचे काम पर्यावरणाला कोणताही धोका न पोहोचता सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीने त्यांचा अहवाल वेळेत सादर केला नसल्याचे कारण पुढे करत, सारंग यादवाडकर यांनी पुन्हा थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तसेच, मेट्रोतर्फे सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या समितीने गेल्या मार्चमध्येच याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर, त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याने अखेर ही याचिका मागे घेत असल्याचा खुलासा याचिकाकर्त्यांना न्यायालयासमोर करावा लागला. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिकाच निकाली काढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.