FIR against Kangana Ranaut : वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईत कंगनावर गुन्हा दाखल, लावले देशद्रोहाचे कलम!

एमपीसी न्यूज – अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते.त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाच्या विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला आहे. कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंगना वर कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 124 अ हे देशद्रोहाचे कलम आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंगाना आणि रंगोली दोघींना पुढच्या एक ते दोन दिवसात चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे. जर चौकशीमध्ये गुन्हा सिद्ध झाला तर दोघींना अटक होण्याची शक्यता आहे. कंगना आणि रंगोली दोघी सध्या मनालीमध्ये आहेत.

महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. कंगना आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला होता.

कंगना धार्मिक तेढ निर्माण करत असून हिंदू-मुस्लिम समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दाव्यात केली होती.

त्यासाठी त्यांनी कोर्टासमोर कंगनाचे व्हिडीओ, ट्वीट्स सादर केले होते. यासर्व गोष्टींची शहानिशा करून कोर्टानं मुंबई पोलिसांना कंगनावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.