Talegaon Dabhade : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले होते. सरकारी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरु ठेवणा-या तळेगाव दाभाडे परिसरातील सहा दुकानदारांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 129 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळेगाव दाभाडे येथील महावीर क्लॉथ (रोशन राजू ओसवाल), प्रतीक गारमेंट्स( ललीत गणेशमल राठोड), वेदांत क्लॉथ सेंटर (भरत विठ्ठलदास मेहता), दत्तकृपा ज्वेलर्स (विकास बाबुराव चोपडे), मावळ  मार्ट (विवेक माणिकचंद ओसवाल), धनराज ज्वेलर्स (सचिन धनराज ओसवाल) या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी तळेगाव नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले यांनी फिर्याद दिली आहे.

13 मार्च 2010 पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, आंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. यातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.