Wakad: विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) म्हातोबानगर, वाकड येथे घडली.

सपना गणेश काळे (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती गणेश दिगंबर काळे (वय 22), सासू ताई दिगंबर काळे (वय 40), सासरे दिगंबर मारू काळे (वय 44), आजी सासू द्रुपदा सुकळे (वय 50, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सपना आणि आरोपी गणेश यांचा जुलै 2018 मध्ये विवाह झाला.

दरम्यान, आरोपींनी आपसात संगनमत करून घरगुती कारणावरून सपना यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपींनी टेम्पोचे हप्ते भरण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी सपना यांना त्रास दिला. तसेच, तू पांढऱ्या पायाची आहेस, असे हिनवत सपना यांना वेळोवेळी उपाशी ठेवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सपना यांनी गुरुवारी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.