Nigdi Fire News : यमुनानगर येथे कॉम्प्युटरच्या दुकानाला आग; नेपाळच्या कामगाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंग जवळ असलेल्या एका कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानात काम करणाऱ्या नेपाळ येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी, दि. 21) सकाळी उघडकीस आली. अंकित अगरवाल (वय 27, रा. यमुनानगर, निगडी. मूळ रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंग जवळ असलेल्या व्हिजन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क या दुकानाला आग लागली. याची माहिती सकाळी साडेसात वाजता पिंपरी चिंचवड अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उपविभाग यांचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे.

या आगीच्या घटनेमध्ये एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण देखील अद्याप समजू शकलेले नाही. मयत तरुण त्याच दुकानात काम करत होता आणि दुकानातच राहत होता. दुकानाच्या पोटमाळ्यावर ही आग लागली असून त्यात त्या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री झोपताना त्याने आतून लॉक लावून घेतले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाण्यास अडचण आली. काही वेळेनेनंतर जवानांनी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अंकित मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याचा मृत्यू नेमका आगीत होरपळून झाला की गुदमरून झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.