Fire Brigade Pune News : परतीच्या पावसाचे पुण्यात थैमान; रस्ते जलमय, घरांसह दुकाने, कार्यालयात पाणी घुसले

50 हून जास्त झाडे कोसळल्याची अग्निशमन विभागाची माहिती

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने पुण्यात अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी शहरातील मध्य पेठांसह मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. शहरासह उपनगरांमध्ये विविध भागातील घरांमध्ये पाणी शिरले, झाडे पडली तसेच दुचाकी व चारचाकी वाहनं वाहून गेल्याच्या तक्रारीचे सुमारे 100 हून अधिक फोन अग्निशमन दलाच्या कार्यालयात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आली आहे.

शहर आणि परिसरात दुपारी 3 नंतर हळूहळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते दहाच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर रात्री सिंहगड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरम्यान रात्री 12 वाजता पाण्याचा थोडा जोर कमी झाला. परंतु पावसाचं पाणी दुकानं, घरे, पार्किंग आणि कार्यालयांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवाने कुठेही जिवीतहानी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणीत वित्तहानी झाल्याची शक्यता आहे.

शहरातील मध्य पेठेत श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासमोर शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ते जलमय झाले होते. सखल उतारावरील भागातील काही वाड्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. काही ठिकाणी पडझड झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत.

सहकार नगर येथील टांगेवाला कॉलनी, गुरुराज सोसायटी, ट्रेझर पार्कसह आंबील ओढ्यालगतच्या वसाहतींमध्ये पाणी शिरले होते. टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विद्या विकास शाळेत हलविण्यात आले. तर ट्रेझर पार्क सोसायटीतील नागरिकांची तळ पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू होती.

सहकारनगर, अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज मठ परिसर येथून कमरेइतके पाणी वाहत होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गजानन महाराज मठामागील साती आसरा शाळेत देखील पाणी शिरले होते. रात्री उशिरा येथील 15 ते 20 जनावरे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली आहेत.

बल्लाळ सोसायटीत पाणी शिरले होते. तळजाई परिसरातील रस्त्यावर प्रचंड पाणी वाहत होते. सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावरून जोरदार पाणी वाहत होते. लक्ष्मीनगर शाहू वसाहत व मार्केटयार्ड येथील आनंदनगर येथील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची दैना उडाली.

महर्षीनगर भागातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. मुसळधार पावसाच्या पाण्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला. गुलटेकडी परिसरातील इंदिरानगर, डायस प्लॉट, खिलारे वसाहत, मार्केटयार्ड भागातील आंबेडकरनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असताना वाहने वाहून गेल्याचे प्रकार घडले.

औंध, बाणेर रस्ता, सकाळ नगर, बोपोडी, पंचवटी, पाषाण, सूसरस्ता, सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. पाषाण ते सूस रस्ता येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या दोन तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. लक्ष्मीनगर येथील शाहू वसाहतीमध्ये अनेक घरांत 3 ते 4 फूट पाणी शिरले. घोरपडीमध्ये रस्त्यावर व खोलगट भागात पाणी साचले होते.

सहकारनगर संतनगर अण्णा भाऊ साठे नगर, लक्ष्मी नगर शिवदर्शन, शाहू वसाहत, शंकर महाराज वसाहत, आनंद नगर,संभाजी नगर शंकर महाराज वसाहत या भागात घरांमध्ये पाणी शिरले होते. लेकटाऊन हौसिंग सोसायटीचे बेसमेंट मध्ये पाणी शिरत आहे. सागर कॉलनी, लालबहादुर शास्त्री कॉलनी येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना संपुर्ण रात्र जागून काढावी लागली.

मागील वर्षी आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवण या पावसामुळे नागरिकांना येत असून, ओढ्याशेजारील वस्ती, सोसाट्याचा भागातील नागरिक भयभीत झाले होते. सातारा रस्त्यावरील आंबिल ओढ्या शेजारील गुरुराज सोसायटीमध्ये नागरिक रस्त्यावर आले होते. पुन्हा मागील वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ना या काळजीत होते.

दरम्यान शहरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. तर घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले व रस्त्यांवर 50 हून जास्त झाडांची पडझड झाल्याच्या तक्रारी अग्निशमन दल कार्यालयात नोंदविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.