Fire incident in Pune : पुण्यात शुक्रवारी सायंकाळी तीन आगीच्या घटना

एमपीसी न्यूज – पुण्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी (Fire incident in Pune) वेगवेगळ्या ठीकाणी तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या तीनही घटनात कोणीही जखमी झाले नसून आर्थिक नुकसान मात्र झाले आहे.

पहिल्या घटनेत अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी अग्निशमन मुख्यालयात त्यांच्या कार्यालयातून अप्सरा थिएटरच्या दिशेला मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याचे नियंत्रण कक्षात कळवताच तातडीने दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. त्यावेळी तिथे नाल्यामधे मोठ्या प्रमाणात कचरा पेटून प्रचंड धुर झाला होता. अग्निशमन प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर व जवानांनी आग पुर्ण विझवली.

दुसऱ्या घटनेत सायंकाळी सव्वा सात वाजता हडपसर मधील (Fire incident in Pune) चिंतामणी नगर येथे गादी कारखान्यात आग लागल्याची वर्दी मिळाली. यावेळी हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी सुमारे 6 ते 7 कापसाच्या गाद्यांनी पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत आग विझवून पुढील धोका टाळला. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे व जवानांनी कामगिरी पूर्ण केली. आगीचे कारण समजू शकले नाही.

याचवेळी रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळ तारा मॉल येथे आग लागल्याची वर्दी मिळाली असता मुख्यालयातून एक फायर गाडी एक देवदूत वाहन, कसबा अग्निशमन वाहन व एक वॉटर टँकर रवाना करण्यात आले. घटनास्थळी सात मजली इमारतीच्या टेरेसवर एसी डक्ट पॅनेलला आग लागून तिथेच असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाकीने पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत सुमारे दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली,  या घटनेत कोणी जखमी नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. तसेच अग्निशमन अधिकारी पंकज जगताप व प्रशांत गायकर व जवानांनी कामगिरी केली.

रविवार पेठ येथील आग शहराच्या विविध भागातून दिसून आल्याने नियंत्रण कक्षात असंख्य फोन गेले होते. यावेळी अग्निशमन दलातील अँब्युलंस अटेन्डट व तेथील रहिवासी असलेले प्रविण सिद्धे यांनी विषेश मदत करत अग्निशमन वाहन पोहोचण्याआधी व नंतर योग्य ते मदतकार्य करुन आपले कर्तव्य बजावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.