Chakan : भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात

चाकणमध्ये गॅरेजला आग

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक महामार्गालगतच्या चाकण (ता. खेड) येथील भंगार दुकानातील सुमारे दहा जुन्या मोटारींना आग लागल्याची घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

या दुकानातील कामगारांनी व अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न तातडीने केल्याने आग तासाभरात नियंत्रणात आली. अन्यथा या भागातील लगतच्या दुकानांना या आगीची झळ बसली असती. भंगारातील सुमारे दहा मोटारी या आगीत स्वाहा झाल्याचे दुकानातील कामगारांनी सांगितले. परिसरातील कचऱ्याला लावण्यात आलेली आग या मोटारींना लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरले होते. आगीचे व धुरांचे लोळ मोठ्या प्रमाणावर दिसून लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

राजगुरुनगर नगरपरिषद आणि चाकण एमआयडीसीच्या दोन बंबांनी ही आग तासाभरात आटोक्यात आणल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. भंगार माल आणि जुन्या मोटारींचे यात मोठे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत याबाबत चाकण पोलिसात या जुन्या मोटारींच्या गॅरेजचे मालक श्रीकांत परदेशी यांच्याकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नव्हती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.