Pimpri : फ्लॅटमध्ये अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – फ्लॅटमध्ये अडकलेल्या पाच जणांची संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाच्या एका पथकाने सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश होता. ही कामगिरी आज (मंगळवारी) पिंपरी येथे करण्यात आली.

सुरेश जगताप (वय 65), वैशाली जगताप (60), श्रीकांत माने (32), सात्विक करपे (वय 5) आणि कृष्णा करपे (वय 11) अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील सत्यम हाऊसिंग सोसायटीमध्ये विक्रांत कॉम्प्लेक्सच्या दुस-या मजल्यावर जगताप यांचा फ्लॅट आहे. दुपारच्या वेळी बाहेर जाण्यासाठी जगताप निघाले असता फ्लॅटचा दरवाजा बाहेरच्या बाजूने बंद झाला. सर्वजण बंद घरात अडकले. त्यांनी आसपासच्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे बाहेरून लॉक झालेला दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे सुरेश यांनी अग्निशमन विभागाला दुपारी 2.40 वाजता फोन केला.

फोनवरून माहिती मिळताच फायरमन अनिल बिंबळे, सर्वश उंडे, विवेक खंडेवाड, संभाजी दराडे, प्रतीक दराडे, शीतल माने, विशाल जाधव आणि वाहन चालक विशाल लाडके यांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पथकाने बंद फ्लॅटची पाहणी करून काही वेळेत लॉक झालेला दरवाजा उघडून घरात अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.