Pune : अग्निशमन दलाच्या वाहन चालकाची आगीवर मात; वयाच्या ५८ व्या वर्षी जवानाचे कर्तव्यच

एमपीसी न्यूज – अग्निशमन दलाकडे असणारे वाहन चालक हे विविध अग्निशमन वाहने चालविण्यात तरबेज असतातच व एखादी आगीची घटना घडली किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास वेळेत कसे पोहचावे हे कौशल्य त्यांच्या अंगी असतेच. पण हे असताना एक जवान म्हणून आगीशी सामना करण्यासाठी ही ते सज्ज असतात अशीच एक घटना काल घडली.

पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात वाहन चालक म्हणून काम करणारे बंडेराव गणपती पाटील(वय ५८) हे काल सकाळी ड्युटी करून ते पिंपळे गुरव येथे घरी असताना सायंकाळी त्यांच्या शेजारी असणारया घरामध्ये आग लागून गृहपयोगी काही साहित्य व फ्रिज जळाले. ही घटना घडत असताना नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर पाटील यांनी त्या घराकडे तातडीने धाव घेतली व एक स्थानिक युवक योगेश पाटील यांच्या मदतीने तेथील पाण्याचा वापर करत आग विझवली. यामध्ये घराचे नुकसान झाले तरी पाटील यांच्या तत्परतेने पुढील अनर्थ टळला. नंतर रहाटणी अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले होते. पाटील यांनी केलेल्या कामाचे स्थानिकांनी कौतुक केले.

अग्निशमन वाहन चालक बंडेराव पाटील हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त असून अग्निशमन दलात कर्तव्य बजावत आहेत. आयुष्यभर देशाची सेवा करुन ते वयोपरत्वे वयाच्या ५८ व्या वर्षी येत्या मे महिन्यात अग्निशमन दलातून ही निवृत्त होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.