Wakad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिली एमपीडीए कारवाई

वाकड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणा-या एका सराईत गुन्हेगारावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यानुसार त्याला एक वर्ष स्थानबद्ध करत येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. ही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एमपीडीए ची पहिलीच कारवाई आहे.

अनिकेत अर्जुन चौधरी (वय 21, रा. पाषाणकर निवास, प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मण नगर, थेरगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

अनिकेत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करून दहशत पसरवीत होता. त्याला स्थानबद्ध करण्यासाठी वाकड पोलिसांनी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना पाठवला. आयुक्तांनी कागदपत्रांची छाननी करून आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाकड पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करून येरवडा कारागृहात ठेवले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून एमपीडीएची ही पहिलीच कारवाई असून यापुढील काळात आणखी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.