Alandi :आळंदीत रंगले पहिले आध्यात्मिक कवीसंमेलन

उभा क्षणभरी....कवी देवाचिये द्वारी, कवितेतून दिला सामाजिक संदेश

एमपीसी न्यूज – “ज्या काव्यामध्ये प्रासादिकता, नूतनता आणि सामाजिकता असते ते काव्य समाजप्रबोधन करते; आणि यासाठीच सकल संतांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत,” असे मत वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरीमहाराज चौधरी यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे व्यक्त केले. शनिवारी (दि. १९ जानेवारी) शब्दधन काव्यमंच आयोजित ‘उभा क्षणभरी… कवी देवाचिये द्वारी’ या आध्यात्मिक कविसंमेलनाचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी ह.भ.प. चौधरी होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार ह.भ.प. राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. राजाभाऊ चोपदार म्हणाले की, “कीर्तनात जे प्रबोधन केले जाते, ते आज कवितांच्या माध्यमातून कवींनी केले, हे अतिशय स्तुत्य आहे. शब्द हे माध्यम आहे; आणि शब्द हेच कवींचे भांडवलदेखील असते!” तुळशीला पाणी घालून आणि पूजन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तर “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…” ही हरिपाठातील पारंपरिक रचना सुभाष चव्हाण यांनी सादर करून कविसंमेलनाचा प्रारंभ केला. फुलवती जगताप यांच्या “मनी ब्रह्मांड बसले… मला हे दत्तगुरू दिसले!” आणि प्राची देशपांडे यांनी म्हटलेल्या, “ब्रह्म सनातन, भगवंत जाण” या रचना भक्तिरसाच्या निर्मितीस पोषक ठरल्या. “विठ्ठलनाम मुखी घेता, हरती यातना सर्वथा!”या शरद शेजवळ यांच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगणार्या गीताने भक्तिरंगाची उधळण केली.

बी.एस.बनसोडे यांच्या,”माझा विठ्ठल पंढरी, उभा चंद्रभागे तीरी…”आणि कैलास भैरट यांच्या,”देव माझा पांडुरंग,नाम घेता जीव होई दंग”या कवितांनी श्रोते दंग झाले. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांच्या, “नेसला पिवळा पीतांबर,जरी शेला अंगावर…”या गेय कवितेला रसिकांनी सामूहिक गायनसाथ केली. भक्त आणि भगवंत यांच्या प्रेमाचे विविध अनुबंध निशिकांत गुमास्ते यांनी ‘प्रेमाची तर्हा’ या काव्यरचनेतून उलगडून दाखवले.
“बीज पेरले नामाचे दारी…डोलतो विठ्ठल!”ही रचना राज अहेरराव यांनी खड्या आवाजात सादर केली; तर “भ्रमरा, जा तुझ्या राधेला राग भारी आला…!”या संगीता झिंझुरके यांनी गायलेल्या अतिशय सुरेल कवितेने रसिक मंत्रमुग्ध झाले. आत्माराम हारे यांनी ‘जीवनसार’ या कवितेतून सामाजिक संदेश दिला. आणि “पिंपळपाने सळसळ करिती ज्ञानेश्वरी गाती…” या अशोक कोठारी यांच्या भक्तिरचनेने अध्यात्मभाव अधोरेखित केला.

वर्षा बालगोपाल यांनी आपल्या कवितेतून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांविषयी भक्तिभाव मांडला. प्रदीप गांधलीकर यांचा ‘कैवल्याची आस’ हा अभंग, रघुनाथ पाटील यांची आशयघन ‘काव्यपंढरी’ आणि मधुश्री ओव्हाळ यांनी आपल्या कवितेतून संतांमधील मांडलेला माणूस श्रोत्यांना विशेष भावले.

वाय.के.शेख आणि आय.के.शेख हे कविबंधू तसेच बाबू डिसोजा या कवींनी सादर केलेल्या उत्कट भक्तिरचनांनी धार्मिकतेचे बंध गळून पडले आणि मैफलीचा अवघा रंग एकचि झाला. संगीता जोशी, नीलेश म्हसाये, श्यामराव सरकाळे यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. आनंद मुळूक यांनी संत जनाबाईंची आणि तानाजी एकोंडे यांनी संत एकनाथांची भक्तिरचना सादर केली. प्रा.अमित ताले यांनी चित्रपटगीत सादर केले.

“विठ्ठलाची भेट ज्ञानदेवा झाली… दिंडी आनंदली!” ही कविता अतिशय आर्त सुरात सादर करून अनिल नाटेकर यांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. प्रपंचातील विरक्तीभाव प्रकट करणारी सुरेश कंक यांची ‘कृष्णार्पण’ ही कविता श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली. “माझी माउली नांदते आळंदीनगरीत…” ही पीतांबर लोहार यांची काव्यरचना लोकगीताचा प्रत्यय देणारी होती; तर सविता इंगळे यांनी आपल्या कवितेतून कर्मकांडांचा फोलपणा मांडला.

“आता काव्यात्मके देवे…”हे आधुनिक काळातील पसायदान नंदकुमार मुरडे यांनी सादर केले. संत तुकाराम महाराजांच्या वेषभूषेतील प्रकाश घोरपडे यांनी आपल्या पहाडी आवाजात भैरवी सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाची सांगता सामुदायिक पसायदान झाले.
यावेळी सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. संध्या लोहार, मीरा कंक, सुषमा जानवेकर, जयश्री गुमास्ते, माधुरी डिसोजा, दैवता घोरपडे, रजनी अहेरराव, विश्वनाथ वरखेडे, शरद काणेकर, रामचंद्र प्रधान यांनी संयोजनात परिश्रम घेतले. समर्पक अन् मोजक्या शब्दांत प्रत्येक कवितेवर भाष्य करीत पीतांबर लोहार यांनी सूत्रसंचालन केले. तर उमेश सणस यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.