Dehuroad: बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या 5 जणांना अटक, देहूरोड, वाकड पोलिसांत गुन्ह्यांची नोंद

five arrested for handling weapons illegally at dehuroad and wakad

एमपीसी न्यूज- बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने दोन प्रकरणात 4 जणांना आणि वाकड पोलिसांनी एका प्रकरणात एकाला अटक केली आहे. याबाबत बुधवारी (दि.27) देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात अल्बर्ट सायमन जोसेफ (वय 20), अनमोल गणेश काकडे (वय 22, दोघे रा. देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी दुपारी पावणे पाच वाजता देहूरोड येथील एम बी कॅम्प मधील महात्मा गांधी शाळेजवळ आरोपी अल्बर्ट आणि अनमोल दुचाकीवरून जात होते. अनमोल याच्या हातात तलवार होती. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी दोघांवर कारवाई करत 500 रुपये किमतीची तलवार आणि 15 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात राहुल संजय टाक (वय 19), अभिषेक टिकम्या रेड्डी (वय 20, रा. देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस शिपाई धनंजय भोसले यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजता देहूरोड येथील एम बी कॅम्पमधील महात्मा गांधी शाळेजवळ आरोपी दुचाकी घेऊन थांबले होते. अभिषेक याच्याकडे कोयता होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली.

दोघांकडून एक कोयता आणि दुचाकी असा एकूण 15 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

तिसऱ्या प्रकरणात संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय 27, रा. काळा खडक झोपडपट्टी, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक व्ही एस कुदळ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपी संदीप याला 22 सप्टेंबर 2018 रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे हत्यार बाळगण्यास मनाई आहे. असे असताना बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता आरोपी संदीप याने कोयता बाळगला.

कोयत्याचा धाक दाखवून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ लोकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये दहशत निर्माण करताना पोलिसांना आढळला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.