Nigdi : रावण टोळीतील पाच जणांना अटक; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – वाहनांची तोडफोड करून ट्रक चालकांना मारहाण करत लुटणाऱ्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावत रिव्हॉल्वर, तीन लोखंडी कोयते आणि रोकड असा एकूण 42 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी कुप्रसिद्ध रावण टोळीचे सदस्य आहेत.

अविनाश दिलीप शेलार (वय 19), स्वप्नील उर्फ बबलू शिवाजी वाघमारे (वय 22), नरेश शंकर चव्हाण (वय 19), सूर्यकांत सुनील फुले (वय 19, सर्व रा. चिंचवड), किरण शिवाजी खवळे (वय 20, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 11) अवतार सिंग आणि त्यांचा सहचालक ट्रान्सपोर्टनगर येथे त्यांच्या ट्रकमध्ये (पी बी 10 / जी झेड 5913) आराम करत होते. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग यांच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारले. यामध्ये त्यांचे दात पडले. तर सहचालक हरमित सिंग यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. टोळक्याने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने 2 हजार 200 रुपये चोरून नेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांना हे आरोपी रावण टोळीचे सदस्य असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आकुर्डी स्टेशन येथे दोघेजण दुचाकीवरून वेगात जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने पकडले. त्यांच्याकडे अवतार सिंग यांना मारहाण केल्याचा गुन्हा केल्याबाबत विचारले असता त्यांनी त्यांच्या चार साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक बनावत रिव्हॉल्वर, तीन लोखंडी कोयते आणि रोकड असा एकूण 42 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. एका अल्पवयीन मुलासह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, ज्ञानेश्वर कोकाटे, किशोर पढेर, विलास केकाण, सतीश ढोले, रमेश मावसकर, प्रवीण मुळूक, विनोद होनमाने, तुषार गेंगजे, चौधरी, अमोल साळुंखे, विजय बोडके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.