Pimpri : दुचाकीसाठी तासाला पाच रुपये तर ट्रकसाठी 100 रुपये मोजावे लागणार; पार्किंगच्या वाढीव दराला महासभेची मान्यता

महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने वाहनाच्या प्रकारानुसार दरात केले फेरबदल

एमपीसी न्यूज – कमी दरामुळे पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने पिंपरी महापालिकेने ‘पार्किंग’च्या दरात वाढ केली आहे.  ‘ए’, ‘बी’, ‘सी’ झोनमध्ये वाहनाच्या प्रकारानुसार तासाचे नव्याने वाढीव दर निश्चित केले आहेत. त्यानुसार प्रति तासाकरिता दुचाकी पाच रुपये, रिक्षा पाच रुपये, चारचाकी दहा रुपये, टेम्पो, मिनीट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खासगी बस 100 रुपये आणि ट्रक,  ट्रेलरसाठी 100 रुपये तासाला मोजावे लागणार आहेत. या वाढीव दराला महासभेने आज (बुधवारी) मान्यता दिली. पार्किंग पॉलिसीच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पार्किंग अॅप तयार करुन पार्किंगचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची निवासी व फिरती लोकसंख्या तब्बल 27 लाखांपर्यंत पोहचली आहे. सन 2017 च्या आकडेवारीवरून शहरात तब्बल 15 लाख 68 हजार 607 वाहने असल्याची नोंद आहे. आतापर्यंत ही संख्या 19 लाखांच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील प्रशस्त रस्तेही पार्किंगसाठी अपुरे पडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी पालिकेच्या बीआरटीएस विभागाने पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली होती. त्यास स्थायी समितीने 9 जून 2018 ला तर, महापालिका सर्वसाधारण सभेने 22 जून 2018 मंजुरी दिली होती.

या धोरणानुसार शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्किंगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन ‘अ’ (उच्च पार्कींग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्कींग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्कींगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्कींग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्कींग) म्हणून घोषित करण्यात आले होते.

त्यानुसार अधिक वर्दळीच्या भागांत वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क आकारण्यात येणार होते. निवासी भागात 24 तास वाहने लावण्यासाठी वार्षिक शुल्क घेतले जाणार होते. दुचाकीस तासाला 2 रूपये, रिक्षाला तासाला 6 रूपये, चारचाकी, टेम्पोला 10, मिनी बसला 15, ट्रॅकला 33 आणि खासगी बसला तासाला 39 रूपये शुल्क आकारले जाणार होते.

महापालिकेने शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार शुल्क आकारण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती. निविदेचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आला होता. तथापि, वाढविलेल्या कालावधीत देखील एकही निविदा प्राप्त झाली नाही. कमी दर असल्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या दरात बदल केले. सुधारित वाढीव दराला महासभेने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.