Pimpri Chinchwad : शहरात पाच घरफोड्या; साडेदहा लाखांचा ऐवज चोरीला

0

एमपीसी न्यूज – दिघी, निगडी, एमआयडीसी भोसरी, शिरगाव आणि सांगवी परिसरात घरफोडीचे पाच प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 12) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच घटनांमध्ये तब्बल 10 लाख 47 हजार 198 रुपयांहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेला आहे.

दिघी पोलीस ठाण्यात पहिला प्रकार दाखल आहे. त्यात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी सव्वाबारा ते साडेबारा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शिवतेज रेसिडेन्सी, दिघी येथील एका फ्लॅटचे कुलूप तोडून घरातून एक लाख 49 हजारांचे नेकलेस झुमके, चैन, टॉप्स, सोन्याचे दागिने चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात दुसरा प्रकार दाखल आहे. त्यात भानुदास विलास रानवडे (वय 46, रा. प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. रानवडे यांच्या घराचे सेफ्टीडोअरचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे, डायमंडचे दागिने, चांदीची भांडी, चांदीचे दागिने, हातातील घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप, टॅब, रोख रक्कम असा एकूण 7 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 12) दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरा प्रकार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यात दत्तात्रय एकनाथ पवार (वय 29, रा. घनसोली, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रीधर शशिकांत कांबळे (वय 19, रा. औंधकॅम्प, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेल्को रोड, पिंपरी येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन मधील सॉर्टेशन सेंटरमधून आरोपी श्रीधर याने फिर्यादी पवार यांचे 97 हजार 998 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडीचा चौथा प्रकार शिरगाव पोलीस चौकीत दाखल आहे. त्यात प्रशांत एकनाथ घारे (वय 35, रा. चांदखेड, ता. मावळ. मूळ रा. घारेवाडी, ता. कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. घारे यांच्या चांदखेड येथील घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 40 हजार 200 रुपयांचे सोन्याचे बदाम, चेन, चांदीची जोडवी असे दागिने चोरून नेले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

घरफोडीचा पाचवा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यात कुणाल देवराज चाळके (वय 21, रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी चाळके राहत असलेल्या फ्लॅटमधून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.