Nigdi News : खाजगी सावकारी आणि फसवणूक प्रकरणी पाच जणांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज – खाजगी सावकारी करून व्याजापोटी भलीमोठी रक्कम मागितली. तसेच धमकी देऊन जबरदस्तीने जागेच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तसेच वाहनांची परस्पर खरेदी विक्री करून फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडला.

बाळकृष्ण अंबादास पवार (वय 35, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहाजी हनुमंत कवितके, हनुमंत कवितके (दोघे रा. चिखली) शहाजी कवितके यांचा अनोळखी साथीदार, सचिन तानाजी निंबाळकर (रा. चिंचवडगाव), विजय वसंतराव ढुमे (रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजी कवितके, हनुमंत कवितके आणि एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादीकडे व्याजापोटी 22 लाख रुपये रकमेची मागणी केली. ‘पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला खलास करून टाकू’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादी यांना त्यांच्या कार्यालयातून ओढून बाहेर नेत कारमधून डांगे चौक येथे नेले.

आंबेठाण चाकण येथे असलेल्या 70 लाख रुपये किमतीच्या सात गुंठे जागेची इसार पावती आणि रिलीज डील दस्त तयार करून त्यावर जबरदस्तीने फिर्यादी यांना सही करण्यास भाग पाडले. विजय ढुमे यांची ऑडी कार आणि सचिन निंबाळकर यांची ऑडी कार ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादी यांनी सर्व रक्कम देऊन त्यांच्या नावावर गाड्यांची डिलिव्हरी नोट तयार केली असताना शहाजी कवितके याने विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांना आर्थिक आमिष दाखवले.

विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांना कोणतेही कायदेशीर हक्क नसताना फिर्यादी यांच्या परस्पर तेच गाड्यांचे मूळ मालक असल्याचे भासवून त्यांच्या संमतीने आरटीओची कार्यालयाची दिशाभूल करून व खोटे कागदपत्रे सादर करून दोन गाड्या शहाजी कवितके यांच्या नावावर ट्रान्सफर करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.