Chakan News : चाकण, निगडी मध्ये पाच चोरीच्या घटना; दोन लाख 63 हजारांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात एक घरोफोडी आणि दोन चोरीच्या तर निगडी पोलीस ठाण्यात दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 14) चाकण आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या पाच घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, युपीएस, बॅटरी असा एकूण दोन लाख 63 हजार 120 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

चाकण येथील घरफोडीच्या घटनेत नितीन देवराम काळे (वय 31, रा. मोई, ता. खेड) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 13) रात्री साडेदहा ते गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेसात या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटातून 80 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चाकण येथील दुस-या घटनेत कांताबाई गणपत भोकसे (वय 75, रा. कुरकुंडी कोरेगाव रोड, ता. खेड) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी सात या कालावधीत फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून अज्ञाताने प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले 50 हजारांचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम चोरून नेली.

चाकण येथील तिस-या घटनेत मंगेश अरविंद कालेकर (वय 32, रा. आगरवाडी रोड, चाकण) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी महात्मा फुले चौक, चाकण येथील सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानात खरेदीसाठी गेले होते. त्यांनी खरेदी केलेले 14 हजार 120 रुपयांचे कानातील टॉप्स काउंटरवर ठेऊन दुसरे सोने खरेदी करत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

अशोक दत्ताराम जोशी (वय 56, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. 14) सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी व इतर पाच जणांचे 70 हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन चोरून नेले.

मोहम्मद अर्शद शेख (वय 47, रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 8 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते मध्यरात्री एक वाजताच्या कालावधीत काचघर चौक, प्राधिकरण येथील फिर्यादी काम करत असलेल्या ऑफिस मधून 49 हजारांचे युपीएस व तीन बॅट-या अज्ञाताने चोरून नेल्या. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.