Chinchwad : कामाचा मोबदला न देता तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कन्सल्टन्सीच्या माध्यमातून नोकरी लावली. तरुणांनी काम केल्यानंतर त्यांना पगार न देता त्यांच्या पगाराच्या पैशांचा अपहार केला. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2019 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

प्रदीप गजानन दांगट, बालाजी सूर्यकांत देवकर (दोघे रा. ढाकणी, ता. उमरखेड), प्रतीक्षा अनिल मंदोधरे (रा. उमरखेड, जि. यवतमाळ), वैशाली मालदोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), शंकर कोल्हापुरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव राजेश पवार (वय 24, रा. लोहगाव, पुणे. मूळ रा. वडगाव शिंदोडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची वाल्हेकरवाडी रोड चिंचवड येथे सिटी स्केप आयटी सोल्युशन्स प्रा. लि. ही कन्सल्टन्सी आहे. या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादी वैभव आणि त्यांच्या मित्रांना जून 2019 मध्ये नोकरीस लावले. त्यांच्याकडून काम करून घेतले. मात्र, त्यांचा पगार न देता त्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. तसेच अन्य आरोपींच्या सांगण्यावरून आरोपी शंकर कोल्हापुरे याने वैभव आणि त्यांच्या मित्रांना धमकी दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.