Bhosari : बारा वर्षीय मुलीचा 19 वर्षीय मुलाशी विवाह; बालविवाह केल्याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींनी बालविवाहास प्रोत्साहन देऊन विवाह घडवून आणला. : Five persons, including her husband, have been booked in a child marriage case

एमपीसी न्यूज – एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याबाबत पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 जून रोजी सायंकाळी साडेसह वाजता तिरुपती चौक, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला. याबाबत 13 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज सुखलाल काळे (वय 19, लांडगेवस्ती, भोसरी) असे बालविवाह करणा-या पतीचे नाव आहे. त्याच्यासह आशिष हकीकत भोसले (वय 30), कारली आशिष भोसले (वय 35, दोघे रा. शांतीनगर, भोसरी), तीरला सुखलाल काळे (वय 40), सुखलाल मोतीलाल काळे (वय 50, दोघे रा. लांडगेवस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वय 12 वर्ष आहे. तिच्या मर्जीविरोधात तसेच अल्पवयीन असताना तिचा विवाह एका 19 वर्षीय मुलासोबत जमावण्यात आला. कोरोनाच्या काळात कुठलाही गाजावाजा न करता विवाह केल्यास कसलीही अडचण येणार नाही, असा विचार करत मुलीच्या आणि मुलाच्या आई-वडिलांनी त्यांचा विवाह 9 जून रोजी लावून दिला.

या विवाहासाठी मुलीने नकार दिला होता. मात्र तिच्या मर्जीविरोधात हा विवाह करण्यात आला. विवाहानंतर मुलगी सासरी नांदत असताना तिने परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क करून सर्व प्रकार सांगितला. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर भोसरी पोलिसांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यावेळी पालकांनी हा त्यांच्या सामाजिक परंपरेचा भाग असल्याचे सांगितले. सध्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या घरी ठेवण्यात आले आहे. तिचे वय 18 वर्ष होईपर्यंत तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर सासरी पाठवता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.