Chinchwad : उत्कृष्ठ कामगिरीबाबत आयुक्तालयातील पाच टीमचा आयुक्तांकडून सत्कार

एमपीसी न्यूज – डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कौतुक केले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पाच टीमचा पोलीस आयुक्तांनी सत्कार करून शाबासकीची थाप दिली. सत्कार केलेल्या पाच टीममध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या दोन, शिरगाव चौकी, पिंपरी पोलीस स्टेशन, देहूरोड पोलीस स्टेशन यांच्या प्रत्येकी एका कामगिरीचा समावेश आहे.

भोसरी परिसरात पुणे-नाशिक रोडने जात असताना एका महिलेच्या गळ्यातील 30 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले होते. ही घटना 23 जुलै 2017 रोजी घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी 11 डिसेंबर 2019 रोजी शिताफीने पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने वरील गुन्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात 10 ठिकाणी सोने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 8 लाख 48 हजार 800 रुपये किमतीचे 231 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. याबाबत युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, अमित गायकवाड, गणेश सावंत, विजय मोरे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले या पथकाचा आयुक्तांनी सन्मान केला.

देहूरोड बौद्धविहाराच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक रिक्षा चालक धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे पत्रक वाटत होता. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आक्षेपार्ह पत्रके वाटणा-या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या पत्रकामध्ये दोन समाजात गैरसमज पसरवून तेढ निर्माण करणारा मजकूर आढळून आला. यामुळे दंगल किंवा अन्य प्रकारचा अनर्थ टळला. याबाबत युनिट एकचे पोलीस नाईक महेंद्र तातळे आणि अंजनराव सोडगीर यांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

सोमाटणे फाट्याजवळ चार जणांनी मिळून पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. या गुन्ह्याचा तपास करत असताना लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या दुधिवरे खिंडीतील जंगलात लपून बसलेल्या चार जणांना शिरगाव पोलिसांनी घटनदात जंगलातून अटक केली. याबाबत शिरगाव पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस कर्मचारी आर एस पालांडे, डी डी काठे, वाय जे नागरगोजे, जे एस कोठावळे या पथकाचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

थरमॅक्स चौकाजवळ एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये चार जणांनी मिळून एका कार चालकाला मारहाण करून लुटले. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षातून पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक डी के तोडकर आणि एस बी माकरे यांनी आरोपींचा पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा घडल्यानंतर काही क्षणात पोलिसांनी तत्परता दाखवून ही कामगिरी केल्याबद्दल पोलीस कर्मचारी तोडकर आणि माकरे यांचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

एकाने एका महिला आणि तिच्या दोन मुलांसोबत संगनमत करून महिलेच्या पतीचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाताची नोंद केली. मात्र, तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला. यामध्ये खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. या कामगिरीबाबत युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर, आशाबाई जाधव या पथकाचा पोलीस आयुक्तांनी सन्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.