BNR-HDR-TOP-Mobile

Lonavla : भाजे लेणी ते लोहगड किल्ला पदयात्रेत पाच हजार नागरिकांचा सहभाग

गड किल्ले व लेण्या संवर्धनाकरिता संपर्क संस्थेच्या उपक्रम

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील गड किल्ले व पुरातन लेण्या यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच या ऐतिहासिक व पुरातन वास्तूची युनेस्कोच्या यादीत नोंद व्हावी, या सर्व परिसराचा पर्यटनात्मक विकास व्हावा याकरिता संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान आयोजित संपर्क पदयात्रेस आज भरघोस प्रतिसाद मिळाला. पाच हजार नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. मागील चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, अभिनेत्री गिरिजा ओक, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, श्रीमंत सरदार उमाराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे, धानोजी (नुरेजंग रावठीकडा) गोरे घराण्याचे वंशज राहुल गोरे, बहिर्जी पायगुडे (रविराय) देशमुख घराण्याचे वंशज नवनाथ पायगुडे, मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सहायक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, भाजे गावचे सरपंच चेतन मानकर, एसबीआय फाऊंडेशनचे सीईओ निक्साँन, डाॅ. ताराचंद कराळे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत हेरिटेज वाँकला सुरुवात करण्यात आली.

डोळ्यांचे पारणे फेडणारी तलवारबाजी, शेजारीच काही अंतरावर भाजे लेणीच्या पायर्‍यांवर भिक्कू महाराज, वासुदेव, तुळशी-वृंदावनाच्या शेजारी फेर धरून गाणी म्हणत नृत्य करणार्‍या महिला, जात्यावर पीठ दळत ओव्या गाणार्‍या वयस्कर महिला, भजनकरी, काही अंतर डोंगर चढून गेल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी मक्याचे कणीस व  वडापावची मेजवानी, विसापूराच्या पायथ्याला पोवाडे गाणारे शाहीर व मल्लखांबाचे नयनमनोहरी खेळ करणारी शाळकरी मुले सोबतच लोहगड, विसापुर, भाजे, बेडसे या पुरातन वास्तूची माहिती देणारे इतिहास अभ्यासक व माहिती फलक पाहायला मिळत होते. निसर्गाचा आनंद घेत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला या वाॅकची सांगता झाली. त्याठिकाणी भरविण्यात आलेले शिवकालीन शस्त्र प्रदर्शन प‍ाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच मनोरंजना करिता महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3