IPL 2021: पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सची हाराकिरी, आरसीबीने केले चारी मुंड्या चित!

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) – पाच वेळा विजेता असूनही या वर्षीच्या लीगमध्ये अजूनही तळ्यात-मळ्यात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यातही अवसानघातकी फलंदाजी करत चांगल्या सुरुवातीनंतरही हातातला विजय पराभवात रूपांतरीत करून आपली अवस्था आपल्याच हाताने बिकट करून घेतली.

आज रोहितने टॉस जिंकून विराटच्या बंगलोर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या स्पर्धेत बऱ्यापैकी चांगली फलंदाजी करणारा देवदत्त पडीकल आज मात्र स्वस्तात बाद झाला. तो भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. दुसऱ्या बाजूने विराट कोहली मात्र तुफान फलंदाजी करत होता. त्याचे फॉर्मात येणे हा या लीग साठी आणि भारतीय क्रिकेटसाठीही खूप मोठा शुभसंकेत आहे. विराटने 20/20 मध्ये 10,000 धावाही यावेळी पूर्ण करत हा विक्रम करणारा पहिला  भारतीय मानकरी ठरताना नवोदित श्रीकर भरतच्या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 68 धावा जोडल्या.

सगळे काही बरे चालले आहे आणि आरसीबी एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच श्रीकर वैयक्तिक वेगवान 32 धावा काढून बाद झाला. त्याने या धावा केवळ 24चेंडूत करताना दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोन बाद 75 अशी धावसंख्या असताना आज एबीडीच्या आधी ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला आणि त्याने विराटचा हा निर्णय किती योग्य आहे हे सिद्ध करायला सुरुवात केली.

धावसंख्येत आणखी 51 धावांची भर घालून वैयक्तिक अर्धशतकी खेळी करून विराट बाद झाला. त्याने 42 चेंडूत  51 धावा करताना तीन षटकार आणि तीन चौकार मारले. तो सोळाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. तेव्हा रॉयल चॅलेंजरच्या 3 बाद 126 धावा झाल्या होत्या आणि अजून 25 चेंडू बाकी होते आणि हातात सात विकेट्सही शिल्लक होत्या. यावेळी सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन मॅक्सवेल ने जबरदस्त टोलेबाजी करताना आपले वेगवान अर्धशतक ही पूर्ण केले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या ही गाठून दिली.

मॅक्सवेलने 37 चेंडूत 53 धावा केल्या. ज्यात सहा चौकार आणि तीन गगनचुंबी षटकार सामील होते.त्याला बुमराहने बाद केले. दुर्दैवाने यानंतरच्या 9 चेंडूत रॉयलचे एबी आणि इतर मातब्बर फलंदाज फायदा उठवू शकले नाहीत आणि 20 षटकानंतर आरसीबीने सहा गडी गमावून 165 धावा बोर्डावर लावल्या होत्या.

मुंबई इंडियन्सकडून बुमराहने चांगली गोलंदाजी करताना तीन गडी बाद केले ज्यातले दोन 19 व्या षटकात मिळवले होते. तर बोल्ट, राहुल चहर आणि मिल्नेने एकेक गडी बाद केला.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आज विजय मिळवणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि डीकॉकने पहिल्या षटकापासूनच जोरदार फलंदाजीला सुरुवात केली. दोघेही आकर्षक आणि आक्रमकही खेळत होते. डीकॉकच्या तुलनेत रोहित जास्त सुंदर खेळत होता. पण संघाची 57 धावसंख्या असताना डिकॉक वैयक्तिक 24 धावांवर चहलच्या फसव्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याच्या जागी ईशान किशन कर्णधाराला साथ देण्यासाठी आला.

दोघेही आपली जबाबदारी ओळखून संघाला विजयपथावर घेऊन जातील असे वाटत असतानाच रोहितच्या हातावर एक चेंडू बसला आणि कदाचित त्यामुळेच त्याची एकाग्रता भंग झाली. जबरदस्त खेळत असलेला रोहित बदली गोलंदाज मॅक्सवेलच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाला.त्याने 28 चेंडुत 43 धावा केल्या ज्यात 5 आकर्षक चौकार आणि एक षटकार सामील होता.

या धक्क्यातून सावरण्याच्या आधीच ईशान किशन अत्यंत खराब फटका मारून चहलचा दुसरा बळी ठरला. तेव्हा मुंबई इंडियन्सची अवस्था तीन गडी बाद 81 धावा अशी झाली होती. अगदी काही षटके आधी फलंदाजी कितीतरी सोपी वाटत होती, तीच कठीण वाटू लागली. आधी फलंदाजीत कमाल करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने या कठीण परिस्थितीचा अचूक फायदा उठवत दडपण वाढवले आणि हे दडपून झुगारून देण्याच्या नादात कृणाल पंड्या त्रिफळाचित झाला. आणि हे कमी की काय, असे वाटावे अशा पध्दतीने सूर्यकुमार यादवही  बाद झाला.

त्याला मोहम्मद सिराजने केवळ आठ धावांवर बाद करून मुंबई इंडियन्सला पाचवा मोठा धक्का दिला. आज हार्दिक पंड्या दुखापतीनंतर पुनरागमन करत होता. त्यात संघाची अवस्था अशी बिकट झालेली. रन निघता निघत नव्हते. सहाजिकच मुंबई इंडियन्सवर दडपण वाढले होते आणि याचाच फायदा घेत हर्षल पटेलने लागोपाठच्या तीन चेंडूवर तीन बळी बाद करत आपली हॅट्ट्रिक नोंदवून मुंबई इंडियन्सच्या गोटात  एकच हाहाकार उडवून दिला.

हार्दिक पंड्या स्कोअरवनवर कोहलीच्या हातात झेल देऊन बाद झाला तर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डला काही कळण्याच्या आधीच बेल्स उडाल्या. नवखा राहुल चाहर या दडपणाखाली गोंधळला आणि त्याने फुलटॉस पायावर ओढवून घेताच हर्षल पटेलची हॅटट्रिक झाली. 2021 च्या  स्पर्धेतली ही पहिली हॅटट्रिक ठरली. यातून मुंबई इंडियन्स सावरले नाही ते नाहीच.

उरलेसुरले कार्य चहलने आणखी अवघड करत आपल्या खात्यात तीन बळी नोंदवले, तर शेवटचा बळी घेत हर्षलनेच मुंबई इंडियन्सला केवळ 111 धावात सर्वबाद करून आपल्या संघाला 54 धावांनी मोठा विजय मिळवून देत स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवतानाच मुंबई इंडियन्सला या पराभवासह थेट सातव्या क्रमांकावर ढकलले.

आयपीएलमधे मुंबईला लागोपाठ दोनदा नमविण्याचा भीमपराक्रम सुद्धा कोहलीच्या संघाने केला आहे. पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या हर्षलने यावर्षीच्या लीग मधली पहिली हॅटट्रिक आपल्या नावावर केलेली आहे. त्याने आतापर्यंत 23 बळी या स्पर्धेत मिळवलेले आहेत. अष्टपैलू कामगिरी करून मुंबईला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.