Pimpri : कोणीही येतं आणि शहरात फ्लेक्स लावून जातं !

औद्योगिक नगरीला अनधिकृत फ्लेक्सबाजीचे ग्रहण

एमपीसी न्यूज – एका नामांकित संस्थेने देशातील शहरांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये राहण्यायोग्य शहरांची यादी प्रकाशित करण्यात आली. संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राहण्यायोग्य शहरांमध्ये पुणे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर पुण्याचीच बहीण समजले जाणारे पिंपरी-चिंचवड शहर या यादीत 69 व्या क्रमांकावर आले. शहराला राहण्यायोग्य बनविण्याचे अनेक निकर्ष यामध्ये लावण्यात आले होते. त्यातच शहराचे विद्रुपीकरण हा देखील महत्वाचा मुद्दा होता. शहराचे विद्रुपीकरण अनेक कारणांमुळे होते. त्यात फ्लेक्सबाजी पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोणीही येतं आणि फ्लेक्स लावून जातं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी, कामगारांची नगरी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या या शहराला फ्लेक्सबाजीचे ग्रहण लागले आहे. मागील आठवड्यात या फ्लेक्सबाजीने कहर केला. मित्राचे आणि त्याच्या प्रेयसीचे भांडण झाले. त्यांच्यातील भांडण मिटावे यासाठी एका बहाद्दराने रातोरात 300 फ्लेक्स बनविले आणि शहरात लावले. ही नसती उठाठेव कशासाठी याबाबत चौकशी केली असता, माहिती समोर आली की, ज्या मित्राचे त्याच्या प्रेयसीशी भांडण झाले होते. ती मागील आठवड्यात मुंबईला गेली होती. ती शुक्रवारी परत येणार होती. त्यामुळे तिची माफी मागण्यासाठी गुरुवारच्या रात्री हे नियोजन करण्यात आले.

शुक्रवारी पारसी नववर्ष दिन असल्यामुळे महापालिकेला सुट्टी होती. त्यामुळे पालिका प्रशासनाला याची कानोकानी खबरही लागली नाही. शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावर माफीनाम्याचे हे फ्लेक्स झळकू लागल्यानंतर सुट्टीवरील प्रशासकीय अधिकारी जागे झाले. पोलिसांना खबर लागली. त्यांनी तात्काळ फ्लेक्स लावणा-यांना शोधून काढले. सुरुवातीला तक्रार देणार म्हणणारे महापालिका प्रशासन मुलांची ओळख पटताच तक्रार देण्यास टाळाटाळ करू लागले. राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे प्रकरण मिटविण्याचा दिशेने वाटचाल करू लागले.

हा अनुभव केवळ एका प्रकरणाचा आहे. भाऊ, मामा, नाना, काका, दादा, भैया, दीदी, वाहिनी, ताई, डॉन, भाई अशा कित्येक उर्फ नावांनी अगदी लहान कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत सर्वांचे फ्लेक्स शहरभर लावलेले दिसतील. त्यात अधिकृत फलकांसह अनधिकृत देखील आहेत. ‘पण लक्षात कोण घेतो’ अशीच स्थिती सध्या प्रशासनाची झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये राजकीय दबाव तर अनेक प्रकरणांमध्ये कामाबद्दलची उदासीनता यामुळे फ्लेक्सचे जाळे वाढत आहे. औद्योगिक विकास साधत असलेल्या शहरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी भेट देत असतात. त्यांच्यासमोर आम्ही ही भाई-दादांची फ्लेक्सबाजी दाखवणे कितपत योग्य आहे, याबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा.

आनंद व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी फ्लेक्सचा उपयोग होतो, ही बाब जरी खरी असली तरी त्यातून आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार ओथंबून वाहत असतात. त्याचे प्रदर्शन या माध्यमातून होत असते. चांगल्या फ्लेक्सबद्दल काहीच आक्षेप नाही. कायदेशीर परवानग्या घेऊन फ्लेक्स जरूर लावावेत, पण त्यावर मजकूर काय आहे. त्यामुळे एखाद्याची बदनामी, विकृत प्रदर्शन होत आहे का? याचाही विचार व्हायला हवा. कायदेशीर बाबींचा आपल्यावर काहीही फरक पडत नाही. त्यासाठी आपल्याकडे मजबूत सेटिंग आहे, असे समजणा-यांनी आपल्या संस्कृतीचे वाभाडे कसे आणि कितपत काढायचे हे वेळीच समजून घ्यायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.