एमपीसी न्यूज : – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी क्रिकेटचे सामने काही काळासाठी रद्द करण्यात आले ते त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीने पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाली. या काळात बऱ्याच क्रिकेटपटूंनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.
इरफान पठान – 2020 च्या सुरुवातीलाच (4 जानेवारी) जलद गती गोलंदाज इरफान पठान याने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॅारमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. इरफान पठानने भारताकडून 120 एकदिवसीय सामने, 29 कसोटी, 24 T20 सामने खेळताना 301 आंतराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. पंजाब आयपीअल टीमकडून खेळताना पठानने 103 सामन्यात 80 बळी घेतले. 2003 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यातून 19 वर्षीय इरफान पठानने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2012 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळलेला एकदिवसीय सामना त्याचा अंतिम आंतराष्ट्रीय सामना ठरला. त्यांनतर तो पंजाबसाठी आयपीएल मधून 2017 पर्यंत खेळला.
प्रग्यान ओझा – भारताचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझाने 21 फेब्रुवारी 2020 ला आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. निवृत्तीची घोषणा करताना 33 वर्षीय ओझाने कोणतेही कारण दिले नाही. त्याने 2009 ते 2013 या कालखंडातील 24 कसोटी सामन्यांत 113 बळी मिळवले आहेत. 18 एकदिवसीय सामन्यात 21 बळी घेतले तर 6 T20 सामने खेळताना त्याने 10 बळी घेतले आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये सचिन वेस्ट इंडिजविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामन्यात 10 बळी घेण्याची किमया ओझाने साधली होती.
एम. एस. धोनी – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेला महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बऱ्याच काळापासून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु होती. 2019 चा विश्वचषक गमावल्यानंतर तर त्याला जास्तच पेव फुटले होते. अखेर त्याने निवृत्ती जाहीर करत त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत T20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
90 कसोटी सामन्यात धोनीने एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. 98 T20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
सुरेश रैना – कर्णधार एम.एस. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यापाठोपाठ लगेचच धोनीचा मित्र आणि त्याचा चेन्नईच्या टीममधला सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली.
सुरेश रैनाने 226 वनडेमध्ये 35.31 च्या सरासरीने 5 हजार 615 रन केले. यामध्ये 5 शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश होता. तर 78 T20 मॅचमध्ये रैनाने 29.16 च्या सरासरीने 1604 रन केले. रैनाने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र रैनाला फारसं यश मिळालं नाही. 18 टेस्टमध्ये त्याने 26.48 च्या सरासरीने 768 रन केले, ज्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येच रैनाने शतक केलं होतं.
30 जुलै 2005 साली रैनाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर 17 जुलै 2018 ला रैना शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. 2011 साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रैना होता. भारताच्या सर्वोत्तम फिल्डर पैकी एक म्हणूनही रैनाने ओळख मिळवली होती.
सुदीप त्यागी – भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीने 18 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. 33 वर्षीय त्यागीने टीम इंडियाकडून केवळ 4 एकदिवसीय तर अवघी 1 T20 मॅच खेळला होता. 4 एकदिवसीय सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. सुदीपने एकूण 41 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 109 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 लिस्ट ए सामन्यात 31 बळी मिळवल्या आहेत. तसेच 23 T20 सामन्यात 16 फलंदाज बाद केले होते.
पार्थिव पटेल – भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने 9 डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 35 वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत 25 कसोटी, 38 वन-डे आणि दोन T20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं 194 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. 2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2004 साली दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातली आपली जागा गमावली. 2018 साली पार्थिव पटेल भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल आणि मोहम्मद आमिर, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन व्हॉटसन, इंग्लंडचा इयन बेल यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.