Flashback 2020 : यंदा ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी घेतली कायमची एक्झिट

एमपीसी न्यूज – बॉलीवूड मधून अचानक एक्झिट घेणाऱ्या कलाकारांची माहिती आपण घेतोय. कालच्या भागात इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत, दिग्दर्शक निशिकांत कामत आणि संगीतकार वाजीद खान यांच्या बद्दल माहिती घेतली.  आज अजूनही काही कलाकारांचा आढावा आपण या भागात घेणार आहोत.

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान – बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं 3 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात उपजारादरम्यान त्यांचा मत्यू झाला, त्या 71 वर्षांच्या होत्या.

चार दशकांच्या करिअरमध्ये सरोज खान यांनी दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजय लीला भंसाली यांच्या ‘देवदास’ चित्रपटात ‘डोला रे डोला’ गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2007 मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ सिनेमातील ‘ये इश्क…’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठीही त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. तसंच खलनायक, चालबाज, हम दिल दे चुके सनम, गुरु याचित्रपटांसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल यांच्यसह अनेक अभिनेत्रींसाठी नृत्य दिगदर्शन केलं होतं.

कॉमेडियन जगदीप – ‘शोले’ चित्रपटात सूरमा भोपाली म्हणून घराघरात पोहचलेले बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचं 8 जुलै रोजी निधन झाल. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी जवळपास 400 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. विनोदाची उत्तम जाण असलेले म्हणून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. शोले, पुराना मंदिर, अंदाज अपना अपना, बिदाई, एजंट विनोद यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. अब दिल्ली दूर नही, मुन्ना, आरपार, दो बिघा जमीन, हम पंछी एक डाल के यासारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. जगदीप यांनी ‘पुराना मंदिर’, ‘कुर्बानी’, ‘शहेनशा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम – प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 25 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. चेन्नईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. तेलुगु, तमीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे.

एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.

अभिनेता आसिफ बसरा – बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी 12 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मक्लोडगंज जोगिवाडा रोडवरील एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली.

ब्लॅक फ्रायडे, परजानिया आदी अनेक सिनेमांमध्ये छोट्या छोट्या पण आठवणीत राहणाऱ्या भूमिका बसरा यांनी वठवल्या होत्या. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या वडिलांची भूमिकाही त्यांनी साकारली होती. असिफ यांनी टीव्ही, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे. जब वी मेट, काय पो छे, क्रिश 3, आउटसोर्सिंग, एक व्हिलन, शैतना, कालाकांडी, हिचकी आदी अनेक चित्रपटांतून आपली छाप सोडली. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सिरीज ‘पाताल लोक’ मध्येही त्यांनी काम केलं आहे.

अभिनेत्री कुमकुम – दिग्गज अभिनेत्री कुमकुम यांच 28 जुलै रोजी मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. कुमकुम यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.

‘मदर इंडिया’, ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’, ‘सन ऑफ इंडिया’, ‘कोहिनूर’, ‘नया दौर’, ‘दो आंखें बाहर हाथ, ‘बसंत बहार’, ‘उजाला’, ‘एक सपेरा, एक लुटेरा’, ‘राजा और रंक’, ‘आंखें’, ‘गंगा की लहरें’, ‘गीत’, ‘ललकार’, ‘एक कंवारा, एक कंवारी’, ‘जलते बदन’, ‘किंग कॉन्ग’ चित्रपटात काम कोलं आहे.

याशिवाय दिग्दर्शक बसू चॅटर्जी, दिग्दर्शक हरिष शहा, अभिनेता मोहित बाघेल, अभिनेता सौमित्र चॅटर्जी, टिव्ही अभिनेत्री दिव्या भटनागर, कथ्थक डान्सर असद डिब्बू, दिग्दर्शक रजत मुखर्जी, अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांनी जगाचा निरोप घेतला. देशात लाखो नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. बॉलीवूड देखील या दिग्गज कलाकारांना कायमचं मुकलं आहे.

सध्या कोरोनामुळे चित्रपटसृष्टी संकटात सापडली आहे. अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने 50 टक्के क्षमतेनं थिअटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रेक्षकांनी थिअटरकडे पाठ फिरवली आहे. अशात येणारं वर्ष सिनेसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.

(समाप्त)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.