Pune : पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळणार – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – पूरग्रस्तांना उर्वरित आर्थिक मदत तातडीने मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिका-यांनी शासनाकडे पाठविलेल्या या विषयाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

अप्पर इंदिरानगर, सुप्पर इंदिरानगर, गुरुराज सोसायटी, टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, ट्रेझर पार्क, आंबेडकर नगर वसाहत, मित्र मंडळ चौक, दांडेकर पूल परिसर, सिंहगड रस्ता या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आमदार मिसाळ यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली.

पूरग्रस्तांना उर्वरित आर्थिक मदत मिळावी. ज्या पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे, त्यांना शासन निर्णयानुसार दरमहा तीन हजार रुपये आणि वार्षिक ३६ हजार रुपये भाड्यापोटी अर्थसहाय्य मिळावे किंवा त्यांना घर बांधण्यासाठी वाशे, पत्रे, बांधकाम साहित्य उपलब्ध करून द्यावे. सुमारे ३१ सोसायट्यांचे पंचनामे झालेले नाहीत ते तातडीने करावेत, अशा मागण्या आमदार मिसाळ यांनी जिल्हाधिका-यांकडे केल्या.

आमदार मिसाळ यांनी महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. पूरग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात प्रभारी आयुक्त रुबल आगरवाल यांना निवेदन दिले.

आमदार मिसाळ यांनी प्रशासनाला पुढील सूचना केल्या

1. झोपडपट्टी पुनर्वसन (एस. आर. ए.) आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी (बी. एस. यू. पी.) योजनेतून पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे

2. पूरग्रस्त भागांतील जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत

3. आपतत्कालीन पूरस्थितीमुळे कोसळलेल्या खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंतीसाठी विशेष बाब म्हणून आर्थिक तरतूद करावी

4. आंबिल ओढ्यालगत सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी तातडीने निविदा काढून पुढील तीन आठवड्यात प्रत्यक्ष काम सुरू करावे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.