Assam Flood Updates : आसाम राज्यातील पुरामुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; केंद्राकडून मदत जाहीर

एमपीसी न्यूज – एकीकडे देशातील अनेक राज्य वाढत्या उष्णतेमुळे होरपळत असताना दुसरीकडे मात्र आसाम राज्य पुराच्या संकटात सापडले आहे. दिवसेंदिवस आसाममध्ये पूरस्थिती गंभीर होत असून राज्यातील 7 जिल्ह्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात सापडल्याने राज्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे, त्यामुळे या परिस्थितीला दोन हात करण्यासाठी, लवकर पुनर्वसन होण्यासाठी केंद्राने तात्काळ 324 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

मदत मिळाल्याचे सांगताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले, आसामच्या सद्यस्थितीच्या पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने 324 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी केली आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. या मदतीमुळे बाधीत लोकांचे सुनिश्चित पुनर्वसन होईल, मदत होईल असा यावेळी सरमा यांनी विश्वास सुद्धा व्यक्त केला.

 नेमकं काय घडलंय? 

आसाम राज्याची पुरामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात आतापर्यंत सात जिल्ह्यांतील 5.61 लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन अहवालानुसार कचार, दिमा हासाओ, हैलीकांडी, होजाई, कार्बी आंगलाँग, पश्चिम मोरीगाव आणि नौगाव या जिल्ह्यांमध्ये अधिक लोक बाधीत झाले आहेत, तेथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे समोर आले आहे.

पुरामुळे राज्यात काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे, त्यामुळे पूर आणि भूस्खलन यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 30 वर पोहोचली आहे. पूरग्रस्त पाच जिल्ह्यांमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या 66 हजार 836 इतकी आहे, तर सर्वाधिक फटका बसणाऱ्या नागावला या भागात 3.68 लाखांहून अधिक लोकांची वस्ती आहे, ज्यांचे पुरामुळे सारेच विस्कळीत झाले आहे. दिमा हासाओ मार्गे दक्षिण आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरामसाठी रेल्वे सेवा अद्याप बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.