Pune : विभागात पूरामुळे 54 जणांचा तर 9000 जनावरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुरामुळे विभागातील एकूण 54 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विभागातील चार लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. पुराच्या तडाख्यात गाय व म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात 8 बचाव पथके तैनात आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकाव्दारे दिली आहे.

पूरग्रस्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू असून पुणे विभागातील 33 हजार 775 पुरग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदानापोटी 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरबाधित क्षेत्रातील पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून विभागात एकूण 1 हजार 169 घरांची पूर्णत: तर 18 हजार 533 घरांची अंशत: अशी मिळून 19 हजार 702 घरांची तर 526 गोठ्यांची पडझड झाली असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, असे पत्रकातून सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.