Pimpri News: राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ आता प्रशासकाचीही ‘क्रॅनबेरी’वर मेहेरनजर!

वर्षभराची मुदतवाढ;  सहा कोटीच्या वाढीव खर्चास प्रशासक राजेश पाटील यांची मंजुरी  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व पाणी मीटर्सच्या नोंदी घेऊन जागेवर बील देण्याचे काम करणा-या ‘क्रॅनबेरी’ या ठेकेदार एजन्सीला 31 मार्च 2023 म्हणजेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी सहा कोटी रूपये वाढीव खर्च होणार आहे. गेली दहा वर्षे हा ठेकदार पाणीपट्टीचे काम करत आहे. राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ आता प्रशासकाचीही ‘क्रॅनबेरी’वर मेहेरनजर असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व पाणी मीटर्सच्या नोंदी घेऊन जागेवर बील देण्याचे काम ‘क्रॅनबेरी’ एन एक्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना 24 फेब्रुवारी 2016 रोजी देण्यात आले आहे. या कामाचा कालावधी पाच वर्षासाठी असून या कामाची मुदत 23 फेब्रुवारी 2021 रोजी संपली आहे. या कामासाठी 16 कोटी 7 लाख 25 हजार रूपये इतक्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या कामास 3 कोटी 40 लाख या वाढीव खर्चासह 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी कामाअंतर्गत महापालिकेच्या सर्व विभागांसाठी जीआयएस इनॅबल ईआरपी सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हे सॉफ्टवेअर तयार होण्यास अद्याप आठ ते दहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने सांगितले आहे. हे सॉफ्टवेअर आल्यानंतर पाणी बिलींगच्या निविदेत बदल करणे आवश्यक राहील.

पाणीबीलासाठी महापालिकेचे सॉफ्टवेअर लागू झाल्यानंतर संगणक प्रणालीचा अंतर्भाव पाणी बीलाच्या कामात राहणार नाही. फक्त रिडींग, बिलींग आणि कलेक्शन चे काम आऊटसोर्सिंगद्वारे करण्यात येईल. त्याकरिता निविदा काढण्यात येईल. तथापि, संगणक विभागामार्फत ही संगणक प्रणाली लागू करण्यास एक वर्षे कालावधी लागू शकतो. त्यामुळे एक वर्षासाठी पुनश्च: नव्याने संगणक प्रणाली घेऊन बील वाटपाचे काम करण्याची निविदा काढण्यास बराच कालावधी लागेल.

रिडींग आणि बीलवाटपाच्या कामाअभावी महापालिकेला मासिक चार ते पाच कोटी रकमेचे उत्पन्न वेळेत मिळू शकणार नाही. त्यामुळे इआरपी संगणक प्रणाली लागू होईपर्यंत सद्यस्थितीत चालू असलेल्या पद्धतीने बिलींगचे काम सुरू ठेवणे आवश्यक आहे.

हे काम पुर्वीच्याच दराने करण्यास क्रॅनबेरी’ एन. एक्स सर्व्हीसेस हे तयार आहेत. त्यामुळे त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत वाढीव खर्चासह मुदतवाढ देण्यात आली आहे. पाणीबील देयके देण्याच्या या कामासाठी 25 कोटी 47 लाख 25 हजार रूपये या खर्चाच्या मर्यादेत 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीकरिता सहा कोटी रूपये वाढीव खर्च होणार आहे.

राष्ट्रवादीच्या सत्ता काळात पाणी बील आऊटसोर्सिंगचे काम सन 2012 मध्ये क्रॅनबेरी’ एन एक्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. मे 2015 मध्ये कामाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी 3 कोटी 92 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला.

भाजपच्या सत्ताकाळातही याच ठेकेदाराला काम देण्यात आले. गेली दहा वर्षे हा ठेकदार पाणीपट्टीचे काम करत आहे. राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ आता प्रशासकीय राजवटीत प्रशासक राजेश पाटील यांनी  मेहेरनजर ठेवल्याने ‘क्रॅनबेरी’ची चलती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.