Pune : समान पाणीपुरवठा पाठोपाठ आता ‘एचसीएमटीआर’च्या ही निविदा रद्द

एमपीसी न्यूज – समान पाणीपुरवठा योजना पाठोपाठ आता ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाच्याही निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. हा पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभाराला मोठा धक्का मानला जात आहे.

समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा या सुमारे तीन हजार कोटी रुपयांनी फुगविण्यात आल्या होत्या. महापालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि प्रसारमाध्यमांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निविदा रद्द केल्या. एक हजार कोटींनी ही योजना कमी होऊन 2 हजार कोटींवर ही योजना आली. पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.

असाच प्रतिष्ठेचा प्रकल्प ‘एचसीएमटीआर’ भाजपने केला होता. भूसंपादन करण्यासाठी मोबदला देणार नसल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जाहीर केले होते. सुमारे 8 हजार कोटी रुपये या योजनेसाठी खर्च होणार होता. या प्रकल्पाला महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी जोरदार हरकत घेतली. या निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली होती. तर, शिवसेनेतर्फेही गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.