Daund News : अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गूळ उत्पादकावर कारवाई

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर छापे टाकून 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 313 किलो भेसळयुक्त गूळ तर 82 हजार 440 रुपये किंमतीची 2 हजार 750 किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी 2022 मध्ये दोन गुळ उत्पादकावर छापे टाकुन 3 लाख 67 हजार 900 रुपये किंमतीचा सुमारे 7 हजार 162 किलो गूळाचा साठा जप्त करण्यात आला होता.

फेब्रुवारी 2022 मध्ये हातवळण येथील गूळ उत्पादकावर छापा टाकून गूळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी घेण्यात आलेले घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे घोषीत करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे.

जुलै 2022 मध्ये गुऱ्हाळ घरांना भेसळीसाठी पुरविण्यात येणारी 7 लाख 75 हजार रुपये किंमतीची सुमारे 25 हजार किलो साखर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत प्रशासनास मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.