Pimpri : भाजपमध्ये पदांसाठी रात्री साडेबारानंतरच फोन येईल – रावसाहेब दानवे

एमपीसी न्यूज – पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत रहा. कोणासाठी संधी केव्हा चालून येईल हे सांगता येत नाही. ही भाजप आहे. कधी आणि कोणते पद मिळेल हे सांगता येत नाही. पक्षाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे.  जागा आपल्याकडे एवढ्या आहेत की माणसं मिळत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साहाने पक्षाचे काम करत रहावे. उत्साह कायम ठेवा. प्रत्येकाला पक्षात संधी मिळेल. कोणत्या दिवशी फोन येईल हे सांगता येत नाही. पण पदांसाठी रात्री साडेबारानंतरच फोन येईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. 

केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानिमित्त रावसाहेब दानवे, पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे आज (सोमवारी) दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे त्यांचे हस्ते ई-उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी दानवे बोलत होते.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, संघटन मंत्री रवी अनासपुरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ‘पीसीएनटीडीए’चे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्रदेश नेत्या उमा खापरे, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, युवा मोर्चाचे अध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, बाबू नायर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते.

एखाद्या निवडणुकीत तिकीट नाही मिळाले. तर, नाराज होऊ नका. पक्षाचे काम करत रहा. पक्ष कामाची दखल घेतो. आपला नंबर कधीही लागू शकतो, असे सांगत दानवे यांनी विधानपरिषदेवर कार्यकर्त्यांना कशी संधी दिली याची माहिती दिली. रात्री साडेबारा वाजता अचानक कार्यकर्त्यांना फोन केला. अचानक उद्या आमदारकीचा अर्ज भरायचा असल्याचे सांगितले. त्यामुळे ही भाजप आहे. भाजपमध्ये कधीही संधी मिळते. त्यासाठी पैसा असला पाहिजे. गोरा असला पाहिजे असे काही लागत नाही. पद मिळण्यासाठी अंघोळीची, दाढी करण्याची कोणतीही गरज नाही. नशिबात असले पाहिजे. फेअर अॅण्ड लवली लावायचे काम नाही. त्यामुळे पक्षाचे काम करत रहा, असे समजू नका की आपल्याला संधी मिळणार नाही. प्रत्येकाला पक्षात संधी मिळेल. परंतु, पदासाठी रात्री साडेबारानंतरच फोन येईल.

दानवे म्हणाले, मी सामान्य कार्यकर्त्यांचा तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, पक्षाचा राज्याचा अध्यक्ष झालो. भाजपमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील सदस्याला पदे मिळू शकतात. सायकलवर सदस्य नोंदणी करतो. तो कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो. हे केवळ भाजपमध्ये होऊ शकते. अन्य कोणत्याही पक्षात होऊ शकत नाही. त्यासाठी निष्ठेने पक्षाचे काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजप पक्ष परिवार आहे. काही पक्ष परिवाराची पार्टी आहेत. मंत्री, आमदाराला जेवढी किंमत नाही. तेवढी भाजपमध्ये पदाधिका-याला किंमत आहे.  काँग्रेस आता शिल्लक राहणार नाही. जनतेने काँग्रेसला गरिबी आणली आहे.  काँग्रेसला कोण विचारात नाही. त्यांच्याकडे पद घ्यायला कोण तयार नाही, अशी टीकाही दानवे यांनी काँग्रेसवर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.