Cremation Ceremony : अंत्यविधीसाठी आता लाकडांऐवजी ‘ब्रिकेटस’चा वापर होणार, वृक्षतोडीस आळा बसणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी (Cremation Ceremony) लाकडांऐवजी ‘ब्रिकेटस’चा (Briquettes, पर्यावरण पूरक विट) वापर केला जाणार आहे. यामुळे वृक्षतोडीस आळा बसेल. पर्यायाने पर्यावरणाची हानी टळेल तसेच राखेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शहरात “प्लास्टिक मुक्त पिसीएमसी मोहिम”, महापालिका कर्मचाऱ्यांना ई-व्हेईकल खरेदीसाठी अग्रिम आणि अनुदान देणे, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी ई-व्हेईकल चार्जिंग पॉईन्टची उभारणी करणे, नद्यांमधील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी “रिव्हर प्लॉगेथॉन मोहिम” असे विविध उपक्रम राबवित आहे.

आता पर्यावरणपूरक अंत्यविधी (Cremation Ceremony) करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका शहरात चिंचवड-लिंकरोड, भोसरी व निगडी येथील स्मशानभूमीमध्ये ब्रिकेटस बनवणाऱ्या संस्थांना जागा उपलब्ध करून देणार असून यासाठी महापालिकेने ब्रिकेटस बनविणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. ब्रिकेटस बनविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित संस्थांना अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्मशानभूमीमध्ये ब्रिकेटसचा वापर अंत्यविधी करण्यासाठी सध्यस्थितीत असलेल्या लोखंडी साचा / सांगाडा यामध्ये गरजेनुसार बदल करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असणार आहे.

Breaking news : भांडणाला कंटाळून वडिलांनी केला मुलाचा खून

ब्रिकेटसमध्ये अंत्यसंस्कार करताना त्याबाबत स्वतंत्र अद्यावत नोंद रजिस्टर ठेवणे, प्रत्येक अंत्यविधीची नोंद ठेवणे, अंत्यविधीसाठी आलेल्या मृतदेहाचे वजन, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रिकेटसचे वजन याची नोंद ठेवणे तसेच नागरिकांनी अंत्यविधीसाठी ब्रिकेटसचा वापर करणेबाबत जाहिरातीद्वारे आवाहन करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल. अंत्यविधीसाठी ब्रिकेटसचा वापर करणे कोणत्याही नागरिकांवर अथवा मृतांच्या नातेवाईकांवर बंधनकारक असणार नाही. एका कामासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास तसेच ब्रिकेटसचा दर समान असल्यास पात्र संस्थेस सोडत पद्धतीने काम देण्यात येणार आहे. स्मशानभूमीमध्ये ब्रिकेटस विक्रीसाठी देण्यात आलेली परवानगी 1 वर्षाकरिता राहील. पात्र नियुक्त संस्थांना काम सुरु करण्यापूर्वी 1 लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Maharashtra political crisis : पक्षादेश न मानल्याने राज्यसभेतून खासदार झाले होते अपात्र, एकनाथ शिंदे गटाला हा निकष लागू शकतो का ?

ब्रिकेटस साठा करण्याची व्यवस्था संबंधित संस्थेने स्वखर्चाने करणे, मंजूर दराप्रमाणे वापरण्यात आलेल्या ब्रिकेटसची रितसर पावती मृतांच्या नातेवाईकांना देणे, अंत्यविधीकरीता लागणारे ब्रिकेटसचे वजन व त्याचा दर नमूद करणे त्याचबरोबर ब्रिकेटस व्यतिरिक्त लागणारे साहित्य याची माहिती देणे आवश्यक असणार आहे. यासाठी संस्था तयार करत असलेले ब्रिकेटस अथवा ब्रिकेटस पुरवठा केलेली कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. आवश्यक शासकीय परवाने घेण्याची जबाबदारी संबधित संस्थेची राहणार असून ब्रिकेटस विक्री व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क संस्थेस आकारता येणार नाही. अटीयुक्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. अटींची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी 15 दिवसाच्या आत पात्रतेबाबतचे अर्ज कागदपत्रांसह महापालिकेच्या आरोग्य मुख्य कार्यालयात सादर करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.