Maval : पाचाणे येथे बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पाचाणे येथे एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला मंगळवारी (दि. 17) सकाळी यश मिळाले. या कामगिरीमुळे पाचाणे आणि आजूबाजूच्या अन्य गावकऱ्यांनी वन विभागाचे कौतुक केले.

वडगाव मावळ वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नियत क्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा ते सात महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पाचाणे आणि आसपासच्या गावात बिबट्याचा वावर होता. मागील दोन ते तीन महिन्यात हा वावर जास्त आढळून आला. दरम्यान, त्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला चढवला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते.

काही ग्रामपंचायतींच्या वतीने वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. त्यानुसार वनविभाग काम करत होता. मात्र, बिबट्याला पकडण्यात यश येत नव्हते. दरम्यान, वनविभागाकडून पाचाणे येथील शेतकरी राजाराम शिंदे यांच्या शेतात सोमवारी सकाळी पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी पहाटे पाच वाजता या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या या परिश्रमाला अखेर यश आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला पाचाणे ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले. याबाबत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वनविभागाने बिबट्याला पकडून कात्रज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्याला योग्य त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like